पेन्सिल्वेनिया, 14 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथे गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. या हल्लेखोराला अमेरिकेच्या सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी जागीच ठार केले. थॉमस मॅथ्यू असे या 20 वर्षीय हल्लेखोराचे नाव असून, तो अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील बेथेल पार्क येथे वास्तव्यास होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या सीक्रेट सर्व्हिसने थॉमस मॅथ्यू याच्या डोक्यात गोळी झाडली यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
पहा व्हिडिओ –
https://x.com/ThePatriotOasis/status/1812347872580378903?s=19
हल्लेखोर कोण होता?
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. या हल्लेखोराने गोळीबार करण्यापूर्वी त्याचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने ट्रम्प यांचा तिरस्कार करत असल्याचे म्हटले होते. तसेच हल्लेखोराने या व्हिडिओत आपण रिपब्लिकनचा देखील तिरस्कार करत असल्याचे म्हटले आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मॅथ्यूच्या या व्हिडिओची सध्या सुरक्षा यंत्रणांकडून छाननी केली जात आहे.
अशी घडली होती घटना
तत्पूर्वी, अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियामध्ये एका प्रचारसभेला संबोधित करण्यासाठी आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अचानकपणे गोळीबार झाला. ही घटना भारतीय वेळेनुसार, आज पहाटे चारच्या सुमारास घडली. यावेळी हल्लेखोराने त्यांच्यावर एकामागून एक चार गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या उजव्या कानाला गोळी चाटून गेली. त्यामुळे त्यांच्या कानातून रक्त येऊ लागले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी ट्रम्प यांना सुरक्षित बाहेर काढले आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी ट्रम्प यांच्यावर उपचार करून त्यांना डिस्चार्ज दिला. सध्या डोनाल्ड ट्रम्प हे सुरक्षित आहेत.