डोंबिवली, 25 मे: (विश्वजीत खाटमोडे) डोंबिवली एमआयडीसी मधील अमूदान या केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात 11 जण ठार तर 60 हून अधिक जखमी झाले आहेत. ही घटना गुरूवारी (दि.23) दुपारच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी या केमिकल कंपनीच्या मालकाला कोर्टाने 29 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मलय मेहता असे या कंपनीच्या मालकाचे नाव आहे. तत्पूर्वी, या प्रकरणात मलय मेहता आणि त्याची आई मालती मेहता यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
डोंबिवली एमआयडीसीत अमूदान कंपनी मध्ये झालेल्या स्फाेट प्रकरणात कंपनीचा मालक मलय मेहता याला आज कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं त्याला २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी त्याला काल अटक केली होती. #Dombivali #DombivaliMIDC
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) May 25, 2024
29 मे पर्यंत पोलीस कोठडी
त्यानंतर मलय मेहताला आज कल्याण कोर्टात हजर करण्यात आले. तर मालती मेहता यांचे वयोमान आणि त्यांची प्रकृती ठीक नसल्याच्या कारणावरून मालती मेहता यांना आज कोर्टात हजर करण्यात आले नाही. यावेळी त्यांची पोलीस ठाण्यातच चौकशी करण्यात आली. ही कंपनी मुलाच्या नावावर असल्यामुळे या चौकशीनंतर मालती मेहता यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर या प्रकरणात अमूदान कंपनीचे मालक मलय मेहता याला कोर्टाने 29 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
उपचाराचा खर्च सरकार उचलणार
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली एमआयडीसी मधील अमूदान या केमिकल कंपनीच्या बॉयलरमध्ये 23 मे रोजी भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला होता. तर यामध्ये 60 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आवश्यक ती काळजी काळजी घेतली नसल्यामुळे या कंपनीत स्फोट झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या दुर्घटनेप्रकरणी संबंधित कंपनीच्या मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, या दुर्घटनेतील जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. सध्या या दुर्घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.