पुणे, 22 मे: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहरात मद्यधुंद अवस्थेतील एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात कार चालवत दोघांना ठार केल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर, पुणे शहरातील कोरेगाव पार्क परिसरातील पब आणि बारच्या बेकायदा बांधकामांवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने कारवाई सुरू करण्यात आली आहे. यावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोरेगाव पार्क येथील बेकायदेशीरपणे चालवण्यात येणारे पब आणि बार जेसीपीच्या मदतीने जमीनदोस्त केले आहेत.
https://twitter.com/AHindinews/status/1793181930604646552?s=19
https://twitter.com/Info_Pune/status/1792912311104999589?s=19
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
तत्पूर्वी या घटनेनंतर पुणे शहरातील कोरेगाव पार्क येथील हॉटेल ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड (कोझी) व पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर (ओक वुड) मॅरियट सूट- ब्लॅक या दोन्ही हॉटेल व परमिट रूम तसेच पब बंद करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानंतर पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलांना दारू पुरविल्याप्रकरणी पुणे शहरातील हॉटेल ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड (कोझी) व पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर (ओक वुड) मॅरियट सूट ब्लॅक या दोन्ही हॉटेल व परमिट रूम तसेच पबचे आस्थापना विषयक व्यवहार जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ बंद केले होते.
महत्त्वाच्या सूचना
यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने पुणे शहरातील सर्व पब्ससह इतर परमिट रूमची विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. परवानाधारक हॉटेल, पबमध्ये अल्पवयीन मुलांना कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करण्यात येऊ नये. पहाटे 1:30 वाजल्यानंतर कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करण्यात येवू नये. नोकरनामधारक महिला वेटर्समार्फत रात्री 9:30 वाजल्यानंतर कोणतीही विदेशी दारू सर्व्ह करू नये, अशा सूचना पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत.
अन्यथा गुन्हा दाखल होईल
बॉम्बे प्रोहिबिशन कायदा 1949 आणि बॉम्बे फॉरेन लिकर नियम 1953 अंतर्गत येणाऱ्या विविध तरतुदी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर गुन्हे नोंदविण्यात येणार आहेत. संबंधित हॉटेल, पब आणि आस्थापनेला मद्य विक्रीबाबत देण्यात आलेले परवाने निलंबित अथवा रद्द करण्यात येणार आहे, याबाबतची माहिती, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर यांनी दिली आहे.