बारामतीत लोकसभेसाठी अजित पवार यांच्या डमी उमेदवारीच्या चर्चा

बारामती, 16 एप्रिल: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरणार सुरूवात झाली आहे. उमेदवारांना त्यांचे उमेदवारी अर्ज 19 एप्रिलपर्यंत दाखल करता येणार आहेत. तिसऱ्या टप्प्यासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. राज्यात तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघांमध्ये निवडणूक होत आहे. यामध्ये बारामती मतदार संघाचा देखील समावेश आहे. या पार्श्वभूमीवर, बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या 18 एप्रिल रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील बारामती मतदार संघात डमी उमेदवार म्हणून स्वतःचा उमेदवारी अर्ज करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राजकीय पक्षांकडून खबरदारीचा उपाय

जर सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज काही कारणास्तव बाद झाला, तर अशा परिस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून अजित पवार हे त्यांचा डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. दरम्यान, डमी उमेदवार म्हणजे काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. निवडणुकीत एखाद्या उमेदवाराचा अर्ज भरताना राजकीय पक्षांकडून अनेकदा डमी उमेदवाराचा देखील अर्ज दाखल करण्यात येत असतो. हे काही नवीन नाही. महत्त्वाच्या जागेवर उमेदवाराचा अर्ज काही कारणास्तव बाद झाला तर, ऐनवेळी दुसरा उमेदवार शोधावा लागू नये, म्हणून राजकीय पक्षांकडून खबरदारी म्हणून अनेकवेळा डमी उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात येत असतात.

यंदा बारामतीत पवार विरुद्ध पवार

दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघात प्रथमच पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत बारामती मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या नणंद-भावजय यांच्यात लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी सध्या बारामती मतदार संघात जोरदार प्रचार सुरू केला आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे जनता कोणाच्या बाजूने कौल देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *