‘मला आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे’, राम शिंदे यांच्या पोस्टची चर्चा

कर्जत, 12 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार आणि भाजप उमेदवार राम शिंदे यांच्यात लढत आहे. या निवडणुकीसाठी रोहित पवार आणि राम शिंदे यांच्याकडून गावोगावी जोरदार प्रचार सुरू आहे. त्यांच्या या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच राम शिंदे यांच्या सोशल मीडियावरील एका पोस्टची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. या पोस्टमध्ये राम शिंदे यांनी जनतेकडे पैशांच्या मदतीची मागणी केली आहे.

https://x.com/RamShindeMLA/status/1855981766437208345?t=8JS0lNPVhD3k-1VYvq080Q&s=19

राम शिंदे यांची पोस्ट काय?

भाजपचे उमेदवार राम शिंदे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी व महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असून, मला आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे. तरी, माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनी खाली दिलेल्या बँक खात्यात ऑनलाईन प्रणालीद्वारे आर्थिक मदत करून मला सहकार्य करावे,” असे आवाहन राम शिंदे यांनी या पोस्टच्या माध्यमातून केले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्यांनी या पोस्टसोबत स्वतःचा फोन पे, गुगल पे नंबर आणि बँक अकाऊंट नंबर दिला आहे. दरम्यान, राम शिंदे यांनी पैशांच्या मदतीची मागणी केल्यामुळे राजकीय वर्तुळात त्यासंदर्भात विविध चर्चांना उधाण आले आहे.

रोहित पवार विरूद्ध राम शिंदे लढत

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवार विरूद्ध राम शिंदे यांच्यात लढत होणार आहे. ही लढत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात 2009 आणि 2014 या दोन टर्म मधील आमदारकीच्या निवडणुकीत विजय मिळवला होता. परंतु 2019 च्या निवडणुकीत त्यांचा रोहित पवार यांनी पराभव केला होता. या निवडणुकीच्या माध्यमातून रोहित पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरूवात केली. त्यानंतर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील रोहित पवार आणि राम शिंदे हे नेते एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. अशा परिस्थितीत राम शिंदे हे मागील पराभवाचा बदला घेणार? की रोहित पवार हे पुन्हा एकदा या निवडणुकीत विजय मिळवणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *