पुणे, 25 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यातील अनेक धरण क्षेत्रात सध्या पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे तेथील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणात बुधवारी (दि.29) सकाळी 9 वाजता 108.76 टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. तसेच उजनी धरणात सध्या दौंड येथून 8 हजार 500 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग केला जात असून, त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
https://x.com/Info_Pune/status/1838808841821020482?s=19
11,600 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग
त्यामुळे उजनी धरणातील पाण्याचा साठ्यात लवकरच मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर, आज (दि.29) सकाळी 10 वाजल्यापासून उजनी धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामध्ये उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीत 5 हजार क्यूसेक्स वरून 10 हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे भीमा नदीतील 10 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग आणि विद्युत गृहाचा 1 हजार 600 क्यूसेक्स विसर्ग असा एकूण 11 हजार 600 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सध्या भीमा नदीत सुरू आहे.
सतर्कतेचा इशारा
तसेच हा पाण्याचा विसर्ग पावसाच्या प्रमाणानुसार आणि धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार कमी जास्त होण्याची शक्यता आहे, असे भीमानगर उजनी धरण व्यवस्थापन विभागाने सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर, भीमा नदी काठांवरील गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी यासंदर्भात काळजी घेण्याचे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन विभागाने केले आहे.