चेन्नई, 21 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) आयपीएल स्पर्धेला उद्यापासून (दि.22) सुरूवात होणार आहे. स्पर्धेला एक दिवस शिल्लक असतानाच चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या कर्णधारपदी ऋतुराज गायकवाड याची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे महेंद्रसिंग धोनी आता चेन्नईचा कर्णधार नसणार आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जच्या या घोषणेमुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. त्यामुळे सध्या आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
https://twitter.com/ChennaiIPL/status/1770760276972810687?s=19
महेंद्रसिंग धोनीचा राजीनामा
गेल्या आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळताना आयपीएलचे पाचव्यांदा विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेत देखील धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ सहाव्यांदा विजेतेपद जिंकेल, अशी अपेक्षा चेन्नईचे चाहते करीत होते. मात्र असे असताना महेंद्रसिंग धोनीने अचानकपणे चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधार पदाचा राजीनामा देऊन संघाची धुरा ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवली आहे. त्यामुळे चेन्नई संघाचे चाहते काहीसे नाराज आहेत.
https://twitter.com/IPL/status/1770756521221083153?s=19
ऋतुराज गायकवाडची कामगिरी
ऋतुराज गायकवाडने 2020 मध्ये आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले होते. तेंव्हापासून तो चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळत आहे. त्याने गेल्या वर्षीच्या आयपीएल स्पर्धेत 16 सामन्यात 590 धावा केल्या होत्या. त्यामुळे चेन्नईच्या विजयात ऋतुराजने महत्त्वाची भूमिका बजावली होती. ऋतुराज गायकवाड याच्याकडे कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे. रणजीमध्ये तो महाराष्ट्राचा कर्णधार आहे. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली भारताच्या युवा संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघाने धोनीच्या नंतर ऋतुराजला कर्णधार करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आयपीएल सुरू होण्याआधी सर्व संघांच्या कर्णधारांचे आज एक फोटोशूट झाले. यामध्ये चेन्नईकडून धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाड आला होता.