मुंबई, 18 जून: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत खरीप हंगाम 2024 साठी एक रुपयात पीक विमा भरण्यास आजपासून सुरूवात झाली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी केवळ एक रुपया भरावा लागणार आहे. या योजनेत राज्यातील शेतकरी बांधवांना भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारळे, कापूस व कांदा या 14 पिकांसाठी पीक विमा भरता येणार आहे. राज्य सरकारच्या https://www.pmfby.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिएससी केंद्रांमधून केवळ एक रुपयाचा विमा हिस्सा भरून आपला विमा भरता येईल, या संदर्भातील माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
15 जुलै शेवटची तारीख
या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी विक्रमी संख्येने 15 जुलैच्या आत आपला पीक विमा भरून आपले पीक संरक्षित करून घ्यावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे. दरम्यान, दुष्काळ, अतिवृष्टी तसेच अवकाळी पाऊस यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण मिळावे आणि शेतकरी बांधवांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री एक रुपयात पीक विमा ही योजना सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी प्रधानमंत्री पीक विमा या योजनेअंतर्गत राज्यातील 1 कोटी 70 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी आपला पीकविमा भरून या योजनेत विक्रमी संख्येने सहभाग घेतला होता.