देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार!

मुंबई, 04 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची आज (दि.04) निवड करण्यात आली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री बनणार असल्याचे निश्चित झाले आहे. भारतीय जनता पार्टीने तीन वेळा मुख्यमंत्रिपदाची संधी दिली. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो, असे फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे. तसेच राज्य सरकारने या शपथविधी सोहळ्यासाठी काढलेल्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेत देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे, त्यावरून राज्याच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस हे विराजमान होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

https://x.com/ANI/status/1864201967180108282?t=9Y21uU2HAWD31C9QPKolDg&s=19



त्यामुळे गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवत तब्बल 230 जागा जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकल्या. तर यावेळी शिवसेनेने 57 जागा आणि राष्ट्रवादीने 41 जागांवर विजय मिळवला. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री पदी कोणाची निवड होणार? असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र, निकालाच्या अकराव्या दिवशी भाजपने देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली. तसेच यावेळी राज्याच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनणार असल्याचे स्पष्ट झाले. तर देवेंद्र फडणवीस हे याआधी 2014 आणि 2019 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री बनले होते.

https://x.com/ANI/status/1864209109056426443?t=yz7EHm1qm_bwQQG4_yUKVg&s=19

महायुतीचे नेते राज्यपालांची भेट घेणार

दरम्यान, या शपथविधी सोहळ्याआधी महायुतीचे नेते दुपारी 3 वाजता राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थितीत राहतील. तसेच हे नेते याप्रसंगी राज्यपालांकडे सत्ता स्थापन करण्याचा दावा करतील.

उद्या देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी

राज्य सरकारचा शपथविधी सोहळा गुरूवारी (दि.05) मुंबईतील आझाद मैदानावर सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे. या शपथविधीची आझाद मैदानावर तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, आझाद मैदानावर उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचाच शपथविधी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही दिवसांनी इतर मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार असल्याची चर्चा आहे. परंतू, याबाबत अधिकृत काही सांगण्यात आले नाही. दरम्यान, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाली असली तरी, उपमुख्यमंत्री पद कोणाला मिळणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *