नागपूर, 26 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथील कस्तुरचंद पार्क याठिकाणी राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी फडणवीस यांनी स्वातंत्र्य सैनिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शाळकरी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कवायतींचे निरीक्षण केले. सोबतच त्यांनी याठिकाणी विविध पथके व चित्ररथांची त्यांनी पाहणी केली.
मोदींना अमृतकाळातील विकसित भारत निर्माण करण्यासाठी दायित्व द्यावे: फडणवीस
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष असून त्यांनी लोकशाहीची संकल्पना प्रत्यक्षात राबवून रयतेचे राज्य निर्माण केले. तसेच, प्रभू श्रीरामचंद्रांनी लोकशाही संकल्पनेच्या आधारे रामराज्य निर्माण केले होते. संविधानाने नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारांसोबत मूलभूत कर्तव्याचे पालन करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना अपेक्षित अमृतकाळातील विकसित भारत निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने आपले दायित्व द्यावे, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे: देवेंद्र फडणवीस
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील 25 टक्के जनता ही गरिबीतून बाहेर पडली आहे. भारत देशाने स्टार्टअप यांसारख्या विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचा मोलाचा वाटा आहे. स्टार्टअप उद्योगात भारत अव्वल स्थानावर आहे. सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. 1 रुपयात पीक विमा, कृषी सौर वाहिनी योजना, नमो शेतकरी सन्मान निधी यांसारख्या शेतीविषयक योजनांचा समावेश आहे. राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजना आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षाकाठी 12 हजार रुपये जमा होतात,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
नागपूरसह विदर्भाच्या विकासासाठी कटिबद्ध: देवेंद्र फडणवीस
पुढील तीन वर्षात नागपूर महानगरपालिकेच्या सर्व बसेस इलेक्ट्रिक असणार आहेत. 250 बसेस घेण्यासाठी 137 कोटी रुपये महानगरपालिकेला देण्यात आले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर नागपूर शहरातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी 49 नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित केले जाणार आहे. मालमत्ता कर धारकांना शास्तीमध्ये 80 टक्के सूट देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलेला आहे. नागपूर शहर लवकरच टँकर मुक्त होणार असून मंगळवारी व गांधीबाग टँकर मुक्त झाले आहेत. नागनदी विकासाला, अंबाझरी तलावाच्या बळकटीकरणाला सुरुवात झाली आहे. नागपूरसह विदर्भाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असून ह्या भागाचा भरघोस विकास करण्यात येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.