मुंबई, 05 जून: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील भाजपच्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. तसेच त्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची परवानगी मागितली आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची परवानगी देणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या या पत्रकार परिषदेच्या आधी मुंबईतील भाजपच्या पक्ष कार्यालयात राज्यातील भाजप नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची पुढील भूमिका स्पष्ट केली.
https://twitter.com/Devendra_Office/status/1798288416733552906?s=19
पराभवाची जबाबदारी स्वीकारतो
“या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व मी करीत होतो. त्यामुळे या निवडणुकीत झालेल्या पराभवाची सर्व जबाबदारी मी स्वीकारतो. यामध्ये मी स्वतः कमी पडलो आहे. ती कमतरता भरून काढण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे हा जो काही भारतीय जनता पक्षाला सेटबॅक महाराष्ट्रात सहन करावा लागला. याची सगळी जबाबदारी देवेंद्र फडणवीस मी याठिकाणी स्वीकारतो,” असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
उपमुख्यमंत्री पदातून मुक्त करा!
मी पक्षाला अजून एक विनंती करणार आहे, भाजपमध्ये पक्ष सर्व निर्णय घेतो. आता मला विधानसभेला पूर्ण वेळ उतरायचे आहे. त्यामुळे मी भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करणार आहे की, त्यांनी मला सरकारकडून मोकळे करावे आणि पक्षामध्ये मला त्यांनी पूर्णवेळ काम करण्यासाठी संधी द्यावी. जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत, त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पुर्ण वेळ देता येईल, अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचे आहे, ते आमची टीम करेल. त्यांच्यासोबत मी असणारच आहे. यासंदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्याने ते सांगतील त्यानुसार पुढील कारवाई मी करेन, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.