मुंबई, 06 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) देवेंद्र फडणवीस यांची गुरूवारी (दि.05) राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर काल सायंकाळी शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याच्या काही वेळानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात आधी एका रुग्णाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर स्वाक्षरी केली.
https://x.com/ANI/status/1864667532474634493?t=NdgYyLnRzQ7b6ixznjkFRg&s=19
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाखांची मदत
पुण्याचे रहिवाशी असलेले चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्यावर बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्यात येणार आहे. या संदर्भातील उपचारासाठी चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने राज्य सरकारकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती. त्यानुसार, देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर स्वाक्षरी केली. तसेच त्यांनी यावेळी चंद्रकांत कुऱ्हाडे यांना 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश सबंधित अधिकाऱ्यांना दिले.
https://x.com/CMOMaharashtra/status/1864688490790965587?t=Y_BuHvKXT_X36jrneRlhPg&s=19
फडणवीसांनी स्वीकारला पदभार
तत्पूर्वी, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.