नागपूर, 17 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना आज सकाळी घडली होती. या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलर इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची सुद्धा भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1736361063086530951?s=19
अतिशय दुर्दैवी अशा या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आलेली आहे. कंपनीकडून सुद्धा 20 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच या दुर्घटनेतील पीडित कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
या कंपनीत झालेल्या स्फोटाच्या दुर्घटनेतील मृत्यूंबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत देण्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. या कारखान्यात संरक्षणदृष्ट्या महत्वाची उत्पादने निर्माण होत असल्याने जिल्हा प्रशासन, पोलीस व संबंधित सर्व यंत्रणांना मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी या दुर्दैवी घटनेतील जखमींना वेळेत व दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. याबाबतची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करून दिली आहे.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1736287213200044034?s=19
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1736273834331046017?s=19
तत्पूर्वी या दुर्घटनेतील मृतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून श्रद्धांजली वाहिली आहे. “नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात 6 महिलांसह 9 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे. नागपूर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्कात असून स्वतः आयजी, एसपी, जिल्हाधिकारी घटनास्थळी आहेत.” असे देवेंद्र फडणवीस या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1736377444855394645?s=19
तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ट्विटर वरून या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करीत, मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. “बाजारगाव येथील स्फोटाची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या स्फोटाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुर्घटनेतील जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो.” असे अजित पवार यावेळी म्हणाले.