विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांचा उमेदवारी अर्ज दाखल

नागपूर, 25 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होणार असून, त्याची 23 नोव्हेंबरला पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

https://x.com/AHindinews/status/1849728207148208262?t=0mtm18AfrDbJvBcaWSJbmA&s=19

https://x.com/AHindinews/status/1849689570050253183?t=Zs8FLfRMPrl4bTAWJrGpAA&s=19

गडकरी कुटुंबीयांकडून औक्षण

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरी यांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी गडकरी कुटुंबाने देवेंद्र फडणवीस यांचे औक्षण केले. याप्रसंगी, चंद्रशेखर बावनकुळे, गडकरी कुटुंबीय तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा उपस्थित होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील संविधान चौक येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर फडणवीस यांची नागपुरातील संविधान चौक ते आकाशवाणी चौक या मार्गावर रॅली काढण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या या रॅलीमध्ये भाजपच्या प्रमुख नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

https://x.com/AHindinews/status/1849679099931001240?t=xwH2SKAUvBP0QEbdd4qHwg&s=19

फडणवीस यांची प्रतिक्रिया

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “ही माझी सहावी निवडणूक आहे. पण गेल्या पाच निवडणुकांमध्ये ज्या प्रकारे मला जनतेने आणि माझ्या आईने आशीर्वाद दिला आहे, तोच यावेळीही असेल आणि मी खूप चांगल्या मतांनी विजयी होईल,” असा विश्वास यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार प्रफुल गुडधे यांचे आव्हान असणार आहे. त्यामुळे या लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *