मुंबई, 22 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पीए असल्याचे भासवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या विरोधात मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात आयपीसीच्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
https://x.com/ANI/status/1771420423890116665?s=20
15 लाख रुपयांची फसवणूक
सुहास महाडिक आणि किरण पाटील असे याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी देवेंद्र फडणवीस यांचा पीए असल्याचे सांगून 15 लाख रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. त्यानूसार या दोघांच्या विरोधात मुंबईच्या मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात कलम 170, 419, 420 आणि 34 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर सध्या पोलिसांकडून या आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.
यापूर्वी असाच प्रकार उघडकीस आला होता
दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत. त्यांच्या नावाचा गैरवापर करून अशाप्रकारे फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. दोन वर्षांपूर्वी देखील असेच काही प्रकरण समोर आले होते. तेंव्हा एका व्यक्तीने अजित पवार यांचा पीए बोलतोय, असे सांगून पुण्यातील एका प्रसिद्ध बिल्डरला 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली होती.