देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड

मुंबई, 04 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मोठे यश मिळाले आहे. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकल्या आहेत. राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागला. त्यानंतर आज (दि.04) भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. भाजपच्या गटनेतेपदी त्यांची निवड झाल्यानंतर फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.

https://x.com/ANI/status/1864196356581282114?t=NdQFaf4x2htKuan2_HZWnQ&s=19

फडणवीस यांची एकमताने निवड

यावेळी मुंबईतील विधानभवनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या अध्यक्षतेखाली आज भाजपा कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी गटनेते म्हणून फडणवीस त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्यावर भाजपच्या सर्व आमदारांनी एकमताने देवेंद्र फडणवीस यांची पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली. तुम्हा सर्वांनी माझी गटनेता म्हणून निवड केली आणि ही निवड प्रक्रिया करण्याकरिता याठिकाणी आलेले निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांचे मी मनापासून आभार मानतो, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

5 तारखेला शपथविधी सोहळा

दरम्यान, राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या (दि.05) पार पडणार आहे. हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच भाजपचे वरिष्ठ नेते आणि अनेक मान्यवरांना देखील या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्यात देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *