हरल्यानंतर काय बोलायचं त्याची तयारी सुरू आहे, देवेंद्र फडणवीसांची इंडिया आघाडीच्या नेत्यांवर टीका

मुंबई, 09 मे: (विश्वजीत खाटमोडे) देशात यंदा लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यांतील तीन टप्प्यातील निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीवरून इंडिया आघाडीच्या नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे. सायंकाळी 5 वाजता जाहीर होणारी मतदानाची आकडेवारी आणि त्यानंतर अंतिम आकडेवारीमध्ये जवळपास 10 टक्क्यांचा फरक कसा पडतो? असा सवाल विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी केला आहे. या नेत्यांनी वाढलेल्या मतदानाच्या आकडेवारीवर शंका उपस्थित केली आहे. या पार्श्वभूमीवर, इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढलेल्या मतदानाच्या आकडेवारीवर स्पष्टीकरण दिले आहे. सोबतच त्यांनी यावेळी विरोधकांना टोला लगावला आहे. “सध्या ऊन खूप असल्यामुळे अनेक मतदान केंद्रावर रात्री उशिरापर्यंत मतदान होते. त्यामुळे कालांतराने ही सगळी आकडेवारी अपडेट होते. मला असे वाटते की याच्यावर आक्षेप घेणे, त्यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला. सुप्रीम कोर्टाने तो फेटाळून लावला. आता हरल्यानंतर काय बोलायचं? याची सध्या त्यांची तयारी चालू आहे. म्हणून हा आक्षेप घेतला जात आहे,” अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विरोधकांवर टीका केली आहे.

 

मतदानाच्या टक्केवारीत वाढ

दरम्यान, राज्यात तीन टप्प्यातील लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामध्ये अनेक मतदारसंघात सायंकाळी 5 वाजता जाहीर होणारी मतदानाची आकडेवारी आणि त्यानंतर जाहीर होणारी अंतिम आकडेवारी यांत फरक जाणवत आहे. राज्यातील 11 मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यांमध्ये गेल्या 7 मे रोजी मतदान पार पडले. यात बारामती लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 45.68 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली. तर अंतिम आकडेवारी जाहीर झाल्यानंतर बारामतीत 56.07 टक्के मतदानाची नोंद झाली होती. याशिवाय अनेक मतदारसंघात सायंकाळनंतर मतदानाची टक्केवारी वाढल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यावरून इंडिया आघाडीचे नेते सध्या शंका उपस्थित करताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *