पुणे, 20 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आतापर्यंत 141 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाच्या या कारवाई विरोधात विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसदेच्या आवारातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. या आंदोलनात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे निलंबित झालेले खासदार आणि अनेक नेते सहभागी झाले होते.
https://twitter.com/kharge/status/1737351973064569336?s=19
त्यावेळी या नेत्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर त्यांच्या निलंबनाच्या विरोधात निदर्शने केली. याशिवाय ह्या कारवाईच्या निषेधार्थ विरोधी पक्षांच्या खासदारांनी आज संसदेच्या मकरद्वार येथे केंद्र सरकार विरोधात निदर्शने केली. यावेळी त्यांनी ‘लोकतंत्र की हत्या नहीं चलेगी’ यांसारख्या घोषणा देऊन केंद्र सरकारचा निषेध केला. “लोकशाहीत मोदी सरकारची हुकूमशाही चालणार नाही. हे त्यांना महागात पडेल”, असे मल्लिकार्जुन खर्गे यावेळी म्हणाले.
https://twitter.com/INCIndia/status/1737357087900840306?s=19.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून संसदेतील सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष गृहमंत्र्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात उत्तर देण्याची मागणी करत आहेत. यावेळी संसदेचे कामकाज सुरू असताना मोठा गदारोळ निर्माण झाला. त्यानंतर गेल्या दोन दिवसांत संसदेच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षातील एकूण 141 खासदार निलंबित करण्यात आले आहेत. ह्या निलंबित खासदारांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनाच्या काळात संसदेच्या चेंबर, लॉबी आणि गॅलरीत जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील परिपत्रक लोकसभा सचिवालयाकडून जारी करण्यात आले आहे.
https://twitter.com/JagtapSpeaks/status/1737368142895354297?s=19
संसदेतील विरोधी पक्षांच्या 141 खासदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील पुणे शहरातील वारजे उड्डाणपुल परिसरात आंदोलन केले. हे आंदोलन राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यावेळी “धिक्कार असो धिक्कार असो मोदी सरकारचा धिक्कार असो.. नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी” अशा घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. दरम्यान, संसदेत काल राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला आहे.