दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू

दिल्ली, 05 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज (दि.05) मतदानाला सुरूवात झाली असून सकाळी 7 वाजल्यापासून मतदार आपला हक्क बजावत आहेत. हे मतदान सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार असून, 8 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे.

https://x.com/dm_northeast/status/1886967440665391129?t=frkb26E40Jcb40IJ4YpmXg&s=19

70 जागांसाठी मतदान

दिल्लीतील 70 विधानसभा जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील ‘आप’ पक्ष दिल्लीत सलग तिसऱ्यांदा सत्ता राखण्याच्या प्रयत्नात आहे. दुसरीकडे, भाजपने जोरदार प्रचार करत आम आदमी पक्षासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. काँग्रेसही या निवडणुकीत पुनरुज्जीवनाच्या उद्देशाने रिंगणात उतरली आहे.

1.56 कोटी मतदार

निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, दिल्लीतील 1.56 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 86.76 लाख पुरुष, 72.36 लाख महिला आणि 1 हजार 267 तृतीयपंथी मतदार मतदान करतील. त्यासाठी 17 हजार 736 मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक होण्यासाठी निमलष्करी दल, होमगार्ड आणि दिल्ली पोलिसांचे जवान मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले आहेत. मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून, निवडणूक आयोग संपूर्ण प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवून आहे.

राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार

दिल्लीतील विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्व प्रमुख पक्षांनी जोरदार प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस नेते राहुल गांधी आदी राष्ट्रीय नेत्यांनी जाहीर सभा घेतल्या. त्यामुळे दिल्लीकरांचा कौल नेमका कोणाला मिळणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.

जनतेचा कौल कोणाला?

दिल्ली विधानसभा कार्यकाळ 23 फेब्रुवारी 2025 रोजी संपणार आहे. त्यामुळे नवीन सरकार स्थापनेसाठी आजच्या मतदानाचा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. आम आदमी पक्ष पुन्हा सत्ता राखणार की भाजप सत्तांतर घडवणार? तसेच काँग्रेसला अपेक्षित यश मिळेल का? या सगळ्याचा फैसला 8 फेब्रुवारीला होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *