दिल्ली, 08 फेब्रुवारी: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजप आघाडीवर असून, 48 जागांवर विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर दुसरीकडे, या निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. यावेळी आपचे अनेक प्रमुख नेते पराभूत झाले आहेत. यामध्ये दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. तसेच या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांचा देखील पराभव झाला आहे.
https://x.com/ANI/status/1888132826958295087?t=JuwRUaOYiVlQDeGeITTDJQ&s=19
अरविंद केजरीवाल यांचा पराभव
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा भाजपचे प्रवेश वर्मा यांनी पराभव केला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नवी दिल्ली मतदारसंघात आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल, भाजपचे प्रवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांच्यात लढत झाली. या लढतीत प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला. तसेच संदीप दीक्षित हे तिसऱ्या स्थानावर राहिले. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला असल्याचे स्पष्ट झाले असले तरी त्यांचा किती मतांनी पराभव झाला? याची माहिती निवडणूक आयोगाने अद्याप जाहीर केली नाही.
मनीष सिसोदिया यांचा पराभव
याचबरोबर दिल्लीच्या जंगपुरा विधानसभा मतदारसंघात आपचे मनीष सिसोदिया यांचा भाजपचे तरविंदर सिंह मारवाह यांनी पराभव केला आहे. या निवडणुकीत मनीष सिसोदिया यांचा 675 मतांनी पराभव झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. केजरीवाल यांच्या सिसोदिया यांसारख्या दिग्गज नेत्यांचा पराभव हा आम आदमी पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
भाजपची मोठी आघाडी
विधानसभा निवडणुकीत भाजपने दिल्लीतील मतदारांवर प्रभाव टाकत मजबूत स्थान निर्माण केले आहे. सध्याच्या घडीला 70 जागांपैकी भाजप 48 जागांवर आघाडीवर आहे. यातील 32 जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. आम आदमी पक्ष 22 जागांवर आघाडीवर असून त्यांचे 15 उमेदवार विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसला यश मिळताना दिसत नाही. काँग्रेसचा एकही उमेदवार सध्या आघाडीवर नाही. त्यामुळे दिल्लीच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडत असून, भाजप सत्तेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे.