दिल्ली, 10 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि.07) दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 8 फेब्रुवारीला या मतदानाची मतमोजणी होणार आहे. दरम्यान, दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून (दि.10) सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 17 जानेवारी आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांकडे अर्ज दाखल करण्यासाठी 7 दिवसांचा कालावधी आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूक 2025
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 10 ते 17 जानेवारीपर्यंत चालणार आहे. 18 जानेवारी रोजी उमेदवारांच्या अर्जांची छाननी केली जाईल, ज्यानंतर अपात्र अर्ज नाकारले जातील. यानंतर उमेदवारांना 20 जानेवारीपर्यंत आपले अर्ज मागे घेण्याचा पर्याय असेल. उमेदवारी अर्जांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर या निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल. विधानसभेचा कार्यकाळ 26 फेब्रुवारी रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीतील 70 विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी दिल्लीत सध्या आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी अनेक ठोस पावले उचलली जात आहेत.
5 तारखेला मतदान
5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, मतदार आपला कौल देण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर पोहोचतील अशी अपेक्षा आहे. 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल आणि त्याचा निकाल जाहीर केला जाईल. दिल्ली निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी प्रचार मोहीम सुरू केली असून, मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना जाहीर करत आहेत. तर यंदाची निवडणूक खूप आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस या राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. दिल्लीत यंदा आप, भाजप आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत पहायला मिळणार आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम:
अधिसूचना जारी होण्याची तारीख: 10 जानेवारी 2025
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख: 17 जानेवारी 2025
उमेदवारी अर्जांची छाननी: 18 जानेवारी 2025
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 20 जानेवारी 2025
मतदानाची तारीख: 5 फेब्रुवारी 2025
मतमोजणीची तारीख: 8 फेब्रुवारी 2025