दिल्ली, 28 जून: (विश्वजीत खाटमोडे) राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 वरील पार्किंगचे छत कोसळल्याची घटना घडली आहे. ही दुर्घटना आज सकाळी घडली. या दुर्घटनेत एका जणाचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण जखमी झाले आहेत. दिल्लीत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ही घटना घडली. त्यानंतर केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1 येथील घटनास्थळाची पाहणी केली. तसेच त्यांनी यावेळी सफदरजंग रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये जाऊन जखमींशी संवाद साधला. या कठीण काळात पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझे विचार आहेत. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्या समन्वयाने परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहे, असे मुरलीधर मोहोळ यावेळी म्हणाले.
https://x.com/mohol_murlidhar/status/1806563550409691645?s=19
https://x.com/mohol_murlidhar/status/1806571903412261168?s=19
मृतांना 20 लाख, तर जखमींना 3 लाख
दरम्यान, सर्व जखमींवर काळजीपूर्वक उपचार केले जात आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 20 लाख रुपये आणि जखमींना 3 लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहेत, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी दिली. तर या दुर्दैवी घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश डीजीसीए ला देण्यात आले आहेत, असेही मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी सांगितले. तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी देखील एम्स रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. यावेळी त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून जखमींवर सर्वोत्तम उपचार करण्याचे निर्देश दिले.
https://x.com/RamMNK/status/1806620805259804819?s=19
https://x.com/RamMNK/status/1806593100577718563?s=19
केंद्रीय मंत्र्यांचे निवेदन जारी
या दुर्घटनेनंतर मंत्री राम मोहन नायडू यांनी एक निवेदन जारी केले आहे. आज सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 येथे मी स्वतः घटनास्थळी भेट देऊन दुर्घटनेची पाहणी केली आहे. टर्मिनलमधून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढणे हे आमचे तात्काळ प्राधान्य होते. त्यामुळे दुपारी 2 वाजेपर्यंतची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. प्रवाशांना त्यांच्या पैशांचा पूर्ण परतावा मिळेल किंवा त्यांना पर्यायी फ्लाईट आणि मार्गांवर बुकिंग करण्याचा पर्याय असेल. दुपारी 2 नंतर सुटणारी उड्डाणे टी2 आणि टी3 वरून चालवली जातील, असे त्यांनी या निवेदनातून सांगितले आहे.
सर्व टर्मिनल्सच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी मी तज्ञांकडून टर्मिनलच्या संरचनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेला प्रतिसाद म्हणून, डजीसीए, बीसीएएस, सीआयईएस, दिल्ली पोलिस आणि एनडीआरएफ यासह सर्व संबंधित एजन्सी जवळच्या समन्वयाने सर्वोत्तम काम करीत आहेत. मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे प्रभावित झालेल्या सर्वांसोबत आमचे विचार आहेत, असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी या निवेदनात म्हटले आहे.