संविधानाच्या प्रतीची विटंबना; परभणीत आंबेडकरी अनुयायी संतप्त

परभणी, 11 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती. येथील संविधानाच्या प्रतीची विटंबना केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका माथेफिरूला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.10) सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेनंतर या माथेफिरूला अनुयायींनी चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ काल आंबेडकरी अनुयायांकडून आंबेडकर पुतळा परिसरात जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच आजच्या दिवशी (दि.11) परभणी बंदचे आवाहन करण्यात आले.

https://x.com/PTI_News/status/1866758999024222232?t=8vj6hPyChU3x5x63-h8A-g&s=19



दरम्यान, परभणी शहरात पुकारण्यात आलेल्या या बंदच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पहायला मिळाले आहे. त्यावेळी आंदोलकांनी वाहनांची व दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ केली. तसेच आंदोलक ठिकठिकाणी दगडफेक करत असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच याठिकाणी पाण्याचा फवारा मारून जमावाला पांगविण्याचा पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज देखील केला. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परभणी शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

आंदोलकांनी शांत राहावे, प्रशासनाचे आवाहन

तत्पूर्वी, परभणी शहरातील आजच्या बंदला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानुसार शहरातील दुकाने आणि बाजारपेठा आज सकाळपासूनच बंद ठेवण्यात आल्या होत्या. तसेच शहरातील शाळा आणि महाविद्यालये यांनाही आज सुट्टी देण्यात आली होती. या बंदच्या पार्श्वभुमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी परभणी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, या बंदच्या आंदोलनाला अचानकपणे हिंसक वळण लागले. आरोपीला कडक शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. दरम्यान, परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखावी, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *