भांबेरी, 26 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित केला आहे. जरांगे पाटील हे आता अंतरवाली सराटी येथे जाणार आहे. तेथे एका बैठकीत चर्चा करून मुंबईला जाण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी आज सांगितले आहे. त्यामुळे या बैठकीत जरांगे पाटील काय निर्णय घेणार? याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
फडणवीसांवर गंभीर आरोप
तत्पूर्वी, सगेसोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे काल आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. मला सलाईनमधून विष देवून मारण्याचा यांचा डाव आहे. तसेच माझे एन्काऊंटर करण्याचे त्यांचे स्वप्न आहे, असे आरोप जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले होते. तसेच फडणवीस यांना मला मारायचेच असेल तर मी त्यांच्या सागर बंगल्यावर येतो, तेथे मला मारून टाका, असे म्हणत जरांगे पाटील हे काल मुंबईकडे रवाना झाले होते.
चर्चा करून अंतिम निर्णय घेणार: जरांगे
मात्र, त्यांना जालना जिल्ह्यातील भांबेरी गावातील ग्रामस्थांनी काल मुंबईला जाऊ दिले नाही. यावेळी भांबेरी ग्रामस्थांनी जरांगे पाटलांना गावातच मुक्काम करण्याचा आग्रह केला. त्यामुळे जरांगे पाटील यांनी काल रात्री भांबेरी गावात मुक्काम केला. त्यानंतर त्यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी लोकांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच आंदोलकांनी कायद्याचा मान राखून पोलिसांना सहकार्य करावे, असेही त्यांनी म्हटले आहे. मी आता पुन्हा अंतरवाली सराटी गावात जाणार आहे. तेथे मुंबईला जाण्याबाबतचा निर्णय चर्चा करून ठरविण्यात येईल, असे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
अंबड तालुक्यात संचारबंदी लागू
मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत भांबेरी गावात मोठ्या संख्येने मराठा आंदोलक असल्याने जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी, काल रात्री 5 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील काहीजण जरांगे पाटलांसोबत मुंबईला जाणार होते, असे म्हटले जात आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी अटक केलेल्या लोकांना सोडण्याची मागणी केली आहे.