डोंबिवली, 24 मे: (विश्वजीत खाटमोडे) डोंबिवली परिसरातील एका केमिकल कंपनीच्या बॉयलरमध्ये काल भीषण स्फोट झाला होता. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढून 11 वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत रात्रीपर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र आज सकाळी आणखी तीन मृतदेह सापडल्याने मृतांची संख्या 11 झाली आहे. या कंपनीला लागलेली आग आटोक्यात आली आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करून काल रात्री ही आग विझविली. सध्या तेथे बचावकार्य आणि शोधमोहीम सुरू असून कूलिंग ऑपरेशन सुरू आहे. तर याठिकाणी ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
https://twitter.com/AHindinews/status/1793858359772561883?s=19
https://twitter.com/mieknathshinde/status/1793688405202600083?s=19
मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी पाहणी
दरम्यान, या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला होता. तसेच या स्फोटाच्या आवाजामुळे परिसरातील इमारती आणि गाड्यांच्या काचा फुटल्या होत्या. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या घटनेनंतर डोंबिवली एमआयडीसी परिसरातील कंपन्यांचे उद्योग, कामगार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि औद्योगिक सुरक्षा विभागाचे संचालक यांच्या माध्यमातून ए, बी, सी, अशा तीन श्रेणीत वर्गीकरण करून त्यातील अतिधोकादायक कंपन्या इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा पर्याय या कंपन्यांना देण्यात येणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. तसेच मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील इतर एमआयडीसीमधील कंपन्यांच्या सुरक्षिततेची देखील तपासणी करण्याचे निर्देश उद्योग मंत्र्यांना दिले आहेत. या घटनेचा तपास करत अपघाताची करणे शोधून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडून जखमींची विचारपूस
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन या दुर्घटनेतील जखमी रुग्णांची विचारपूस केली. याप्रसंगी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.