मुंबई, 16 मे: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईतील घाटकोपर येथे 13 मे रोजी सायंकाळी होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या घटनेत आतापर्यंत 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 42 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. या दुर्घटनेतील बचावकार्य आता पूर्ण झाले आहे. याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे. भूषण गगराणी यांनी आज घटनास्थळी पोहोचून चालू परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
https://twitter.com/mybmc/status/1790962484645417195?s=19
https://twitter.com/ANI/status/1790955885243855246?s=19
पेट्रोल पंप असल्याने कामास उशीर
घाटकोपरमध्ये सध्या या होर्डिंगचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. या दुर्घटनेला जवळपास 60 तास उलटून गेले तरीही हा ढिगारा उपसण्याचे काम अद्याप सुरू आहे. याठिकाणी चालू पेट्रोल पंप असल्याने सांभाळून काम करावे लागत आहे. त्यामुळे या कामाला उशीर लागत असल्याचे भूषण गगराणी यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सर्व होर्डिंग्ज तपासण्याचे आदेश दिले असून, सर्व होर्डिंग्सना स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट आवश्यक आहे. त्यांना आवश्यक स्थिरता देण्यासाठी आकार, पाया आणि वाऱ्याचा वेग यांसारख्या नियमांचे पालन करावे लागेल, असे आयुक्त भूषण गगराणी म्हणाले आहेत.
16 लोकांचा मृत्यू
दरम्यान, मुंबईत 13 मे रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. या पावसामुळे घाटकोपर येथील एका पेट्रोल पंपावर 120 स्क्वेअर फूट आकाराचे लोखंडी होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेत आतापर्यंत 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 42 जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला होता. मुख्यमंत्री शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची शासकीय मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार उचलणार असल्याचे देखील एकनाथ शिंदेंनी सांगितले आहे. याप्रकरणी, सर्व दोषींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.