अमरावती, 06 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांना व्हॉट्सॲपवर व्हिडिओ पाठवून धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात नवनीत राणा यांनी अमरावती पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, अज्ञात व्यक्तीच्या विरोधात कलम 354, 354 ए डी, 506(2) आणि 67 अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, नवनीत राणा यांना ही धमकी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधून देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलीस विभाग सतर्क झाला असून, या धमकी देणाऱ्या व्यक्तीचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.
नवनीत राणांची चौकशीची मागणी
खासदार नवनीत राणा यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. गृहविभागाने या धमकीची दखल घेऊन याप्रकरणाची चौकशी करावी, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, नवनीत राणा यांना यापूर्वी देखील अशा प्रकारच्या धमक्या आलेल्या आहेत. नवनीत राणा यांना 2023 मध्ये फोनवरून धमकी आली होती. त्यावेळी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली होती. त्यानंतर नवनीत राणा यांना आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधून जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यामुळे हे प्रकरण गंभीर असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हनुमान चालिसा वादामुळे चर्चेत
दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती नवनीत राणा हे हनुमान चालिसा आंदोलनामुळे चर्चेत आले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी ठाकरेंच्या यांच्या मातोश्री निवासस्थानाच्या समोर हनुमान चालिसा आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे त्यावेळी राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली होती. तेंव्हा शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य असा सामना पाहायला मिळाला होता.