दावोस, 23 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र सरकारने दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये मोठे यश संपादन केले आहे. या परिषदेच्या दुसऱ्या दिवसापर्यंत (दि.22) 15.70 लाख कोटी रुपयांच्या एकूण 54 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारांमुळे राज्यात 15.95 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत या परिषदेतील महत्त्वाच्या चर्चांमध्ये सहभाग घेतला. या सामंजस्य करारांमुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला आणि रोजगार निर्मितीला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
https://x.com/MahaDGIPR/status/1882247350628012197?t=ygKtrOrIGKDrZpZ-cp_nUQ&s=19
रिलायन्स इंडस्ट्रीजची मोठी गुंतवणूक
दावोस येथील जागतिक परिषदेत दुसऱ्या दिवशी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने महाराष्ट्रात विविध क्षेत्रांमध्ये 3 लाख 05 हजार 000 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या गुंतवणुकीमुळे राज्यात 3 लाख नवीन रोजगारनिर्मिती होणार आहे. पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअल इस्टेट अशा विविध क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. ही गुंतवणूक महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला चालना देत राज्यातील आर्थिक प्रगतीला हातभार लावणार असल्याचे मानले जात आहे.
प्रमुख कंपन्या व गुंतवणूक
त्याचबरोबर इंडोरामा कंपनीने रायगड जिल्ह्यात वस्त्रोद्योग क्षेत्रात 21 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या गुंतवणुकीमुळे 1 हजार रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. तसेच इंडोरामा कंपनीने रायगड जिल्ह्यात टेक्निकल टेक्सटाईल्स क्षेत्रात 10 हजार 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या गुंतवणुकीमुळे 3 हजार रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत. ग्रिटा एनर्जी कंपनीने चंद्रपूर जिल्ह्यात स्टील आणि मेटल्स क्षेत्रात 10 हजार 319 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या गुंतवणुकीमुळे 3 हजार 200 रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत.
दावोस येथील परिषदेत वर्धान लिथियम कंपनीने नागपूरमध्ये इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील लिथियम रिफायनरी आणि लिथियम बॅटरी उत्पादनासाठी 42 हजार 535 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या गुंतवणुकीमुळे 5 हजार रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. तसेच सॉटेफिन भारत कंपनीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआर) मध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 8 हजार 641 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अॅमेझॉन कंपनीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये डेटा सेंटर क्षेत्रात 71 हजार 795 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या गुंतवणुकीमुळे 83 हजार 100 रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. याशिवाय अनेक कंपन्यांनी राज्यात गुंतवणूक केली आहे.