दावोस, 22 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) दावोसमध्ये आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्र सरकारच्या वतीने अनेक मोठे सामंजस्य करार झाले आहेत. या परिषदेच्या पहिल्याच दिवशी 6 लाख 25 हजार 457 कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या करारांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती होणार आहे.
https://x.com/MahaDGIPR/status/1881964467887681961?t=OEis0dAeIDsKhlezdXiiUQ&s=19
https://x.com/samant_uday/status/1881766583489397024?t=X1ZmQ7qN837ng2b5hu4VpA&s=19
टाटा समूहासोबत मोठी गुंतवणूक
दावोस मध्ये राज्य सरकारने टाटा समूहासोबत 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामुळे नाशिकमध्ये कृषी नवोन्मेष केंद्र आणि शेतकऱ्यांसाठी स्मॉल लॅंग्वेज मॉडेल तयार केले जाईल. याशिवाय, टाटा समूह भारतात इंजिन असलेल्या हेलिकॉप्टर उत्पादनावर काम करत आहे. येत्या वर्षात हे हेलिकॉप्टर तयार होईल. ज्यामुळे राज्यात हजारो रोजगार संधी निर्माण होणार आहेत. त्याचबरोबर, जेएसडब्ल्यू समूहासोबत 3 लाख कोटी रुपयांचा ऐतिहासिक करार करण्यात आला आहे. यामध्ये गडचिरोलीत अत्याधुनिक हरित पोलाद प्रकल्प आणि नागपूरमध्ये हरित वाहतूक प्रकल्प उभारले जातील, ज्यामुळे 10,000 लोकांना रोजगार मिळेल.
कल्याणी समूहासोबत गुंतवणूक
तसेच दावोसमध्ये महाराष्ट्र सरकारने कल्याणी समूहासोबत संरक्षण, पोलाद आणि ईव्ही क्षेत्रात 5,200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केला. या करारामुळे गडचिरोली जिल्ह्यात 4,000 रोजगार संधी निर्माण होणार आहेत. दावोसमध्ये महाराष्ट्र सरकारने बालासोर अलॉय लि.सोबत स्टील आणि मेटल्स क्षेत्रात 17,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे रायगड जिल्ह्यात 3,200 रोजगार संधी निर्माण होणार आहेत.
रत्नागिरी पालघरमध्ये रोजगाराच्या संधी
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात 16,500 कोटी रुपयांचा करार झाला आहे. यामध्ये रत्नागिरी येथे संरक्षण क्षेत्रातील प्रकल्प उभा केला जाईल, ज्यामुळे 2,450 रोजगार संधी उपलब्ध होतील. याशिवाय, वेल्स्पूनसोबत 8,500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, ज्यामुळे 17,300 रोजगार संधी निर्माण होणार आहेत. दावोसमध्ये महाराष्ट्र सरकार आणि विराज प्रोफाईल्स प्रा. लि. यांच्यात स्टील आणि मेटल्स क्षेत्रातील 12,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी महत्त्वाचा सामंजस्य करार झाला. या गुंतवणुकीमुळे पालघर जिल्ह्यात 3,500 रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत.
https://x.com/samant_uday/status/1881760492466966753?t=ocW06L8Yd3yQqLTK_Jx1wg&s=19
प्रमुख करार आणि गुंतवणूक
हिरो मोटोकॉर्प, सीएट, व्हीआयटी सेमीकंडक्टर आणि वारी एनर्जी यांसारख्या कंपन्यांसोबतही सामंजस्य करार झाले आहेत. या करारांमुळे राज्यात विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण प्रकल्प उभे राहतील. दावोसमध्ये महाराष्ट्र सरकार आणि वारी एनर्जी यांच्यात हरित ऊर्जा आणि सौर उपकरणे क्षेत्रातील 30,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार झाला. या प्रकल्पामुळे नागपूर येथे 7,500 रोजगार संधी निर्माण होणार आहेत. तसेच रत्नागिरीत व्हीआयटी सेमीकंडक्टर कंपनीसोबत 19,550 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी करार झाला आहे, ज्यामुळे सेमीकंडक्टर क्षेत्रात महाराष्ट्राची प्रगती होईल. दावोस येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत राज्य सरकारने अन्वी पॉवर बॅटरिजसोबत 10,521 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार केला असून, त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथे 5,000 रोजगार निर्माण होतील.