दौंड, 22 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) दौंड रेल्वे स्थानक आता सोलापूरऐवजी पुणे विभागाला जोडण्यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्यानूसार, येत्या 1 एप्रिलपासून दौंड रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडण्यात येणार आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली आहे. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. यासंदर्भात अनेक वेळा पत्रव्यवहार केला असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. तसेच या विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेतली असल्याचे देखील सुप्रिया सुळे यांनी या ट्विटमधून सांगितले आहे.
सुप्रिया सुळेंनी ट्विटमध्ये काय म्हटले?
“ही अतिशय आनंदाची बातमी आपल्यासोबत शेअर करताना मला आनंद होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असणाऱ्या पाठपुराव्याला अखेर यश लाभले असून येत्या 1 एप्रिलपासून दौंड रेल्वे स्थानक सोलापूरऐवजी पुणे विभागाला जोडण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. यामुळे हजारो प्रवाशांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. अनेक वेळा पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष भेट रेल्वेमंत्र्यांकडे या विषयाचा पाठपुरावा सुरु होता. यास यश आले असून, या निर्णयाबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनापासून आभार,” अशा सुप्रिया सुळे या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.
आता अडचणींंसाठी सोलापूरला जाण्याची आवश्यकता भासणार नाही!
“दौंड येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सोलापूरपर्यंत जाणे गैरसोयीचे आहे हे वेळोवेळी रेल्वे प्रशासन आणि मंत्रीमहोदयांच्या लक्षात आणून दिले होते. हा मुद्दा सभागृहातही उपस्थित केला होता. दौंडहून पुण्यात येणाऱ्या हजारो रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी दौंड स्थानक पुणे विभागाला जोडणे अत्यावश्यक असल्याचे अखेर रेल्वे मंत्रालयास पटले. दौंड तालुक्यातील मधील हजारो कर्मचारी पुण्यात काम करतात. इतकेच नाही, तर शेतकरी आणि सर्वसामान्य नागरीकही बाजारपेठ आणि इतर कामांसाठी पुण्यास प्राधान्य देतात. याशिवाय शिक्षणासाठी शेकडो विद्यार्थ्यांचा रोज दौंड ते पुणे असा प्रवास सुरू असतो. या सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी दौंड रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडले असून, आता यापुढे अडीअडचणींंसाठी सोलापूरला जाण्याची गरज भासणार नाही,” असे खासदार सुप्रिया सुळेंनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.