दत्तात्रय भरणे यांची इंदापूरात हॅट्ट्रिक! तिरंगी लढतीत विजय

इंदापूर, 23 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील विधानसभा निवडणुकीत इंदापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचा 19 हजार 410 मतांनी पराभव केला आहे. इंदापूर मतदारसंघात यंदा तिरंगी लढत झाली होती. यामध्ये राष्ट्रवादीकडून दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून हर्षवर्धन पाटील आणि अपक्ष उमेदवार असलेले प्रवीण माने यांच्यात सामना होता. त्यामुळे यंदा इंदापूरात कोण निवडून येणार? याच्या विविध चर्चा इंदापूर तालुक्यात रंगल्या होत्या. अखेर दत्तात्रय भरणे यांनी पुन्हा एकदा इंदापूर विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला आहे.

किती मते मिळाली ?

या निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांना सर्वाधिक 1 लाख 17 हजार 236 मते मिळाली. तसेच हर्षवर्धन पाटील यांना 97 हजार 826 मते मिळाली. तर यावेळी अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना 37 हजार 917 मते मिळाली. दत्तात्रय भरणे यांचा हा सलग तिसरा विजय आहे. यापूर्वी, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचा सलग तिसऱ्यांदा पराभव झाला आहे.

प्रवीण माने यांच्या उमेदवारीचा फटका?

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्या पराभवाचे कारण प्रवीण माने यांची बंडखोरी असल्याची चर्चा रंगली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर शरद पवारांनी हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या प्रवीण माने यांनी त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाकडून प्रवीण माने यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांना यामध्ये यश आले नाही. यावेळी प्रवीण माने हे इंदापूर मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर ठाम राहिले. त्यांच्या उमेदवारीचा फटका थेट हर्षवर्धन पाटील यांना बसला असल्याचे सध्या बोलले जात आहे. तसेच निकालाचे आकडे देखील हेच सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *