मुंबई, 27 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे क्रीडा, युवक व अल्पसंख्यांक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांची वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
https://x.com/bharanemamaNCP/status/1904911571307946181?t=ObAn8JE-h_0-RciB1OeqlQ&s=19
दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया
पालकमंत्री पदी निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना मंत्री भरणे म्हणाले, “पक्षश्रेष्ठींनी माझ्या कार्यप्रणालीवर विश्वास दाखवून वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. दिलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने आणि निष्ठेने पार पाडीन. तसेच वाशिम जिल्ह्याचा सर्वांगीण आणि समतोल विकास करण्यासाठी कटिबद्ध राहीन.”
सर्वांगीण विकासाची अपेक्षा
वाशिम जिल्ह्याला नव्या पालकमंत्र्यांची नियुक्ती झाल्याने आता स्थानिक विकासकामांना गती मिळेल, शासकीय योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल, तसेच जिल्ह्याच्या समस्या अधिक तत्परतेने सोडवल्या जातील, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर दत्तात्रय भरणे हे लवकरच वाशिम जिल्ह्याचा दौरा करून स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्याची शक्यता आहे.
विधानसभेत विजयाची हॅट्ट्रिक!
दरम्यान, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत इंदापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा सलग तिसऱ्यांदा पराभव केला होता. या विजयामुळे त्यांनी हॅट्ट्रिक साधली होती. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. सध्या क्रीडा, युवक कल्याण आणि अल्पसंख्यांक विकास विभागाची जबाबदारी सांभाळणाऱ्या दत्तात्रय भरणे यांच्याकडे आता वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचीही महत्त्वाची जबाबदारी आली आहे.