हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल, निवडणूक आयोगाची माहिती

हरियाणा, 01 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय निवडणूक आयोगाने हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल केला आहे. त्यानुसार, आता हरियाणातील विधानसभेच्या सर्व जागांवर 5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. याशिवाय, जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तारीख देखील पुढे ढकलण्यात आली आहे. आता जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 8 ऑक्टोंबर रोजी होणार आहे. याबाबतची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

https://x.com/ANI/status/1829866904770736165?s=19

बिश्नोई समाजाने केली होती मागणी

यासंदर्भात अखिल भारतीय बिश्नोई महासभेने निवडणुकीच्या तारखा बदलण्याची मागणी केली होती. त्यांची ही मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. त्यानुसार विधानसभा निवडणुकीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. याच्याआधी हरियाणात 1 ऑक्टोंबर रोजी मतदान होणार होते. तसेच जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 4 ऑक्टोबरला पार पडणार होती.

बिष्णोई समाजाने केली होती मागणी

दरम्यान, बिष्णोई समाजाचे गुरू जांभेश्वर यांच्या स्मरणार्थ आसोज अमावस्या हा सण राजस्थान मधील बिकानेर जिल्ह्यात साजरा केला जातो. दरवर्षी या सणानिमित्त हरियाणामधील अनेक बिष्णोई समाजातील नागरिक राजस्थानला जात असतात. यंदा हा सण 2 ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे. त्यामुळे हरियाणातील बिष्णोई समाजातील अनेक नागरिकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागू शकते. या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने हरियाणात 1 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख बदलून ती 5 ऑक्टोंबर केली आहे.

निवडणूक आयोगाने काय म्हटले?

“आपले गुरू जांभेश्वरांच्या स्मरणार्थ आसोज अमावस्या उत्सवात सहभागी होण्याची शतकानुशतके चालत आलेली जुनी परंपरा कायम ठेवणाऱ्या बिष्णोई समाजाच्या मतदानाचा हक्क आणि परंपरांचा आदर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे,” असे भारतीय निवडणूक आयोगाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, हरियाणात आता 5 ऑक्टोंबर रोजी 90 जागांसाठी विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे. तर त्याचा निकाल 8 ऑक्टोंबरला जाहीर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *