‘बाबा तुमचा खूप अभिमान वाटतो!’ श्रीकांत शिंदे यांची वडिलांसाठी भावनिक पोस्ट

मुंबई, 28 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) एकनाथ शिंदे यांनी काल (दि.27) राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. मुख्यमंत्री पदासंदर्भात नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे नेते जो काही निर्णय घेतील त्याला माझा आणि शिवसेना पक्षाचा पाठिंबा असेल, असे एकनाथ शिंदे म्हणाले होते. या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदासाठी माघार घेतली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. यासंदर्भात अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. यादरम्यान, सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या वडिलांसाठी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

https://x.com/DrSEShinde/status/1861820823272620488?t=lUvEdpwnz2CxJm2trDOIlQ&s=19

श्रीकांत शिंदेंनी पोस्टमध्ये काय म्हटले?

“मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वतःला ‘सीएम’ म्हणजे ‘कॉमन मॅन’ समजत. त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला, असे श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले.

त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे प्राधान्य: श्रीकांत शिंदे 

“कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर विश्वास ठेवून, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे. सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोर – गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे. खूप अभिमान वाटतो बाबा!” असे श्रीकांत शिंदे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *