पश्चिम बंगालमध्ये आज ‘रेमल’ चक्रीवादळ धडकणार! प्रशासनाकडून सतर्कता

कोलकाता, 26 मे: (विश्वजीत खाटमोडे) पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर आज रेमल चक्रीवादळ धडकू शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर, एनडीआरएफचे पथक, लष्कर, नौदल आणि तटरक्षक दलाला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. ‘रेमल’ चक्रीवादळाचे पुढील काही तासांत तीव्र वादळात रूपांतरित होईल. हे चक्रीवादळ आज (दि.26) मध्यरात्रीच्या सुमारास बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन, राज्य प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. तसेच केंद्र सरकारवर देखील या चक्रीवादळाच्या स्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचे सांगण्यात आले आहे.

मध्यरात्री चक्रीवादळाचा धोका

“रेमल चक्रीवादळ आज मध्यरात्रीच्या सुमारास बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनाऱ्यांमधून ते तीव्र चक्रीवादळात जाण्याची शक्यता आहे. यादरम्यान, जास्तीत जास्त 110 ते 120 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात,” असे आयएमडीचे शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ दत्ता यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर, येथील मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच रेमल चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता, कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

 

हवामानामध्ये बदल

रेमल चक्रीवादळ संदर्भात विशेष मदत आयुक्त सत्यब्रत साहू म्हणाले की, “आम्ही गेल्या चार ते पाच दिवसांपासून या चक्रीवादळाचे सतत निरीक्षण करत आहोत. हे चक्रीवादळ आज मध्यरात्री धडकेल. त्यामुळे उत्तर ओडिशात पावसाची शक्यता आहे. तसेच मयूरभंज आणि बालासोरमध्ये पाऊस सुरू झाला आहे. आम्ही याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहोत. त्यांना पूर्णपणे सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.” दरम्यान, या चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील मंदारमणी आणि दिघा भागात सध्या हवामान बदलत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *