मुंबई, 26 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबई येथे सुरू होत आहे. या अधिवेशनात विरोधी पक्ष सरकारला अनेक मुद्द्यांवरून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. काल सरकारच्या चहापानावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार घातला. सरकारच्या चहापानाला जाऊन त्यांच्या पापाचे वाटेकरी होणार नाही, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. दरम्यान, या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. पत्रकार परिषदेला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँगेसचे नेते बाळासाहेब थोरात, भाई जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल देशमुख, शिवसेनेचे सुनिल प्रभू, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, शेकापचे जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते.
https://twitter.com/VijayWadettiwar/status/1761708813080793246?s=19
जनतेच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष: विजय वडेट्टीवार
“सरकारच्या आशिर्वादाने राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू आहे. मराठा समाजाची, शेतकऱ्यांची सरकारने घोर फसवणूक केली आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत. घोटाळेबाजांचे, कंत्राटदारांचे सरकारने हित जोपासले आहे. गंभीर पाणी प्रश्नाकडे सरकारने जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी सामाजिक तेढ निर्माण केले आहे. सरकारच्या या नाकर्तेपणामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत आहे. राज्याला उद्धवस्त करण्याचा, खड्ड्यात घालण्याचा कार्यक्रम सरकारकडून सुरू आहे, अशा सरकारच्या चहापानाला जाऊन त्यांच्या पापाचे वाटेकरी होणार नाही,” असे विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
मराठा समाजाची फसवणूक: वडेट्टीवार
“सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केली आहे. आरक्षणाच्या नावाखाली मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. कोर्टात न टिकणारं आरक्षण दिलं आहे. शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. शेतमालाची हमीभावाने खरेदी केली जात नाही. कांद्यावरील निर्यात बंदी उठवली जात नाही. हमीभावापेक्षा कमी दराने कापूस, सोयाबीन खरेदी केली जात आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रूपयांचे अनुदान दिले नाही. तरीही सरकार टेंभा मिरवते आहे. सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातील घोषणांची अंमलबजावणी नाही. विदर्भातील, मराठवाड्यातील शेतकऱ्यांची, जनतेची फसवणूक केली आहे. शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. त्यामुळे आम्ही या सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. यांच्या पापात आम्ही सहभागी होणार नाही. हे फसवं चहापान आम्ही घेणार नाही,” असे विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
सरकारला जनतेच्या कामासाठी वेळ नाही: विजय वडेट्टीवार
“सरकारने केवळ कंत्राटदार, घोटाळेबाजांचे हित जोपासले आहे. कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे काम केले आहे. भ्रष्टाचाराने हिमनगाचे टोक गाठले आहे. राज्यात पाणी प्रश्न गंभीर आहे. तरी देखील सरकारला गांभीर्य नाही. येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होणार आहे. हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष. पक्ष फोडाफोडत व्यस्त असलेल्या सरकारला जनतेच्या कामासाठी वेळ नाही. विदर्भातील प्रश्न, शेतकऱ्याबद्दल अनास्था, घोटाळ्यांची मालिका, भ्रष्टाचाराला ऊत, दलित, आदिवासींवर अन्याय, मुस्लीमांवर अन्याय, ड्रग प्रकरण, राजकारणाचे गुन्हेगारीकरण यामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत आहे,” असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडले तरी सरकार गप्प: वडेट्टीवार
“महाराष्ट्राची राजकीय परंपरा सुसंस्कृत आहे. परंतु या सरकारच्या काळात राजकारणातील गुन्हेगारी वाढली असून राज्याच्या आदर्श, सुसंस्कृत राजकीय परंपरेला गालबोट लागले आहे. गुंड मंत्रालयाता रिल बनवतात. पुण्यात 200 गुंडांची परेड होते त्यानंतर पुण्यात 2200 कोटींचे ड्रग सापडते तरी सरकार गप्प आहे. गुंडांना राजाश्रय मिळत असल्याने पोलीसांना गुंड जुमानत नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर गुंडांशी सल्लामसलत केली जाते. आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करतात. प्रक्षोभक विधान करून, चिथावणीखोर भाषण करू राजकीय वातावरण काही लोकप्रतिनीधी गढूळ करतात. खुलेआम स्टेजवरून माता-भगिनी विषयी काहीही बोलले तरी देखील सरकार त्यांना पाठीशी घालते आहे. गुंडांना पोसण्याचे काम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सरकार करत आहे,” असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजात भांडणे लावली जातायेत: वडेट्टीवार
“मराठा-ओबीसी, एनटी (धनगर), एसटी (आदिवासी), दलित-सवर्ण, हिंदू-मुस्लिम यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण केले गेले. याला सरकारचा आशिर्वाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सर्व समाज एकत्र नांदत आहेत. राजकीय पोळी भाजण्यासाठी या समाजात भांडणे लावण्याचा उद्योग सरकारने केला आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे पेपरफुटी प्रकरणे एकामागून एक समोर येत आहे. परीक्षार्थींमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. युवकांच्या आशा धुळीला मिळवणाऱ्या या सरकारचे चहापान घेणे म्हणजे युवकांचा अपमान होईल, त्यामुळे या चहापानावर बहिष्कार टाकला आहे,” असे विजय वडेट्टीवार या पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.