बारामती, 14 जुलैः बारामती शहरातील रेल्वे स्टेशनच्या मैदानात एक व्यक्ती गावठी पिस्टल बाळगून असल्याची माहिती पेट्रोलिंगवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी शहर पोलीस स्टेशनला कळवली. सदर माहिती बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना देण्यात आली. सुनिल महाडिक यांनी मिळालेल्या माहितीची खात्री करून पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बारामती शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांचे तपास पथक हे रेल्वे स्टेशनच्या मैदानावर गेले. मिळालेल्या माहितीनुसार एक संशयित व्यक्ती त्या ठिकाणी उभा असल्याचे निर्दशनात आले. पोलिसांना पाहून सदर संशयित व्यक्तीने तेथून पळ काढली. मात्र शहर पोलिसांनी चपळाई दाखवत पाठलाग करून संशयित व्यक्तीला पकडले.
सदर संशयित व्यक्तीची तपासणी केली असता त्याच्याकडून तब्बल 25 हजार रुपये किंमतीचा पिस्टल आणि 200 रुपये किंमतीची 2 काडतुसे अशी एकूण 25 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयित आरोपीचे नाव सलमान थोटे (वय 26, मूळ रा. निजामपुरा ता. भिवंडी, जि. ठाणे असून सध्या रा. फुरसुंगी, जि. पुणे) आहे. तसेच सदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून घरफोडी आणि चोरी अशा स्वरुपाचे गुन्हे भिवंडी येथे दाखल आहेत. संशयित आरोपीवर बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.
सदर कामगिरी ही पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, बारामती विभागचे अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामती उपविभागचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, पोलीस अंमलदार अनिल सातपुते, रामचंद्र शिंदे, गौरव ठोंबरे, अभिजीत कांबळे, दशरथ कोळेकर, तुषार चव्हाण, बंडू कोठे, दशरथ इंगोले यांच्या पथकाने केली आहे.