निरवांगी गावात चक्क गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम!

इंदापूर, 31 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) इंदापूर तालुक्यात सध्या एका गायीचे डोहाळे जेवण हा चर्चेचा विषय बनला आहे. इंदापूर तालुक्यातील निरवांगी गावचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती रामचंद्र पेडकर, भास्कर रामचंद्र पेडकर, किरण अशोक पेडकर आणि मंगेश भास्कर पेडकर यांनी त्यांच्या एका गायीचे चक्क डोहाळे जेवण केले आहे. या गायीच्या डोहाळे जेवणाचा सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात पेडकर कुटुंबातील व परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे सध्या पंचक्रोशीतून कौतुक केले जात आहे.

गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम

इंदापूर तालुक्यातील निरवांगी या गावातील पेडकर कुटुंबीयांनी आपल्या लाडक्या गायीच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी त्यांनी त्यांच्या घरासमोर मंडप आणि स्पीकर लावून या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली होती. यावेळी ह्या गायीला देखील चांगलेच सजविण्यात आले होते. ज्याप्रमाणे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होतो, त्याचप्रमाणे गावातील महिलांनी या गायीला ओवाळले. त्यानंतर गाईची ओटी भरून झाल्यावर डोहाळे जेवणाचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी निरवांगी गावातील ग्रामस्थांसाठी गोड जेवण ठेवण्यात आले होते.

पेडकर परिवाराने गायीचे डोहाळे जेवण केले!

दरम्यान, निवृत्त रामचंद्र पेडकर हे निरवांगी गावचे प्रगतशील शेतकरी आहेत. शेती व्यवसायासोबत त्यांचा गाईच्या दुधाचा देखील व्यवसाय आहे. त्यांच्या कुटुंबाने जरशा गायी बरोबरच या गावरान गायीचा लहानपणापासून चांगला संभाळ केला होता. तर पेडकर कुटुंबियांनी आता त्यांच्या या लाडक्या गायीचे डोहाळे जेवण केले आहे. गायीच्या या अनोख्या डोहाळ जेवणाची चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *