इंदापूरच्या तहसिलदारवर भ्याड हल्ला; सुप्रिया सुळेंची गृहमंत्र्यांवर बोचरी टीका!

इंदापूर, 24 मेः इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला झाल्याची घटना घटली आहे. सदर घटना ही इंदापूर शहरातील संविधान चौकात आज, शुक्रवारी (दि. 24) रोजी सकाळी 11 च्या सुमारास घडली आहे. सदर हल्ल्यात तहसिलदारांच्या गाडीच्या काचा लोखंडी रॉडने फोडण्यात आल्या. तसेच हल्लेखोरांकडून तहसिलदारांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकण्याचा आणि मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. सदर हल्ल्यात इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील हे थोडक्यात बचावले आहे.

या घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनेचे गांभीर्य ओळखत तालुक्यात चारही बाजूने नाकाबंदी करण्यात आली आहे. इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गटाच्या) नेत्या सुप्रिया सुळे यांनी या घटनेचा ट्वीटर वरून निषेध नोंदविला आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘ इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला करून त्यांना मारहाण केली. विषेश म्हणजे हा सर्व प्रकार तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर झाला. हल्लेखोरांनी ड्रायव्हरच्या डोळ्यात मिरची पूड देखील फेकली, असे समजते. ही अतिशह गंभीर आणि संतापजनक घटना आहे. गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही. शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल जाते, ही बाब राज्याच्या कायदा- सुव्यवस्थेची स्थिती कशी ढासळली आहे, हे सांगण्यास पुरेशी आहे. तहसिलदार पाटील यांच्याशी मी स्वतः संपर्क साधून त्यांची विचारपूस केली. ही संपुर्ण घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा. आपल्या राज्यात गाडीखाली माणसं चेंगरणारे आपल्या खात्याच्या कृपेमुळे जामीनावर सुटतात. या घटनेचा निषेध. असे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *