कोविशील्ड लसीचे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले, कोर्टात याचिका दाखल

नवी दिल्ली, 02 मे: (विश्वजीत खाटमोडे) कोविशील्ड या कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबत महत्त्वाची बातमी आहे. विशाल तिवारी नावाच्या एका व्यक्तीने कोविशील्ड लसीबाबत भारताच्या सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून त्यांनी कोविशील्ड लसीचे दुष्परिणाम आणि धोके तपासण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. या समितीत एम्सच्या वैद्यकीय तज्ञांचा समावेश असेल. तसेच या समितीचे कार्य सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली व्हायला हवे, असेही त्यांनी या याचिकेत म्हटले आहे.

https://x.com/PTI_News/status/1785615778152161416

काय आहेत मागण्या?

कोविशिल्ड लसीचे दुष्परिणाम आणि धोक्यांची तपासणी करण्यासाठी आणि लसीमुळे होणारे नुकसान निश्चित करण्यासाठी केंद्राला निर्देश देण्याची मागणीही त्यांनी याचिकेतून केली आहे. तसेच ही लस घेतल्यानंतर जे अपंग झाले आहेत किंवा ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांना नुकसान भरपाई देण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला द्यावेत, यांसारख्या मागण्या संबंधित याचिकेत नमूद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या याचिकेवर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ब्रिटनच्या कोर्टात सुनावणी सुरू

काही दिवसांपूर्वी कोविशील्‍ड बनवणाऱ्या एस्‍ट्राजेनेका कंपनीने ब्रिटनच्या कोर्टात कबूल केले होते की, त्यांच्या कोविड लसीचे दुर्मिळ दुष्परिणाम होऊ शकतात. त्यांच्या कोविशील्ड लसीमुळे अतिशय दुर्मिळ प्रकरणांमध्ये रक्त गोठणे आणि प्लेटलेटची संख्या कमी होऊ शकते, असे या कंपनीने ब्रिटनच्या कोर्टात कबूल केले होते. तत्पूर्वी, जेमी स्कॉट नावाच्या ब्रिटीश व्यक्तीने ॲस्ट्राझेनेका कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यासंदर्भात सध्या ब्रिटनच्या कोर्टात सुनावणी सुरू आहे. स्कॉटचा दावा आहे की, या कंपनीच्या कोरोना लसीमुळे तो थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमच्या समस्येने ग्रस्त आहे. तसेच त्यामुळे तो ब्रेन डॅमेजचा बळी ठरला होता. त्यानंतर या कंपनीच्या कोरोना लसीविरोधात ब्रिटनमधील डझनहून अधिक लोकांनी कोर्टात धाव घेतली आहे. या लोकांनी देखील याबाबत नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *