दिल्ली, 05 जून: (विश्वजीत खाटमोडे) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 7 दिवसांच्या जामीनासाठी दाखल केलेली अंतरिम जामीन याचिका दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने बुधवारी फेटाळली आहे. केजरीवाल यांनी वैद्यकीय कारणास्तव 7 दिवसांसाठी जामीन वाढवून देण्याची विनंती कोर्टात केली होती. मात्र, त्यांची याचिका आज कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्याचबरोबर कोर्टाने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 जूनपर्यंत वाढ केली आहे. तत्पूर्वी, अरविंद केजरीवाल यांनी 2 जून रोजी तिहार तुरूंगात आत्मसमर्पण केले होते. दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याच्या आरोपावरून केजरीवाल सध्या तुरूंगात आहेत.
https://twitter.com/ANI/status/1798295427168768405?s=19
https://twitter.com/ANI/status/1798294565847466491?s=19
19 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी
तत्पूर्वी, अरविंद केजरीवाल यांच्या जामीनावरील निर्णय दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने 5 जूनपर्यंत राखून ठेवला होता. या याचिकेवरील निर्णय ऐकण्यासाठी अरविंद केजरीवाल यांना आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टासमोर हजर करण्यात आले. यावेळी केजरीवाल यांच्या जामीनाला ईडीने कडाडून विरोध केला होता. वैद्यकीय कारण सांगून केजरीवाल हे कोर्टाची दिशाभूल करत असल्याचे यावेळी ईडीने म्हटले होते. त्यानंतर कोर्टाने अरविंद केजरीवाल यांची याचिका फेटाळून लावत त्यांना 19 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यावेळी कोर्टाने संबंधित अधिकाऱ्यांना तिहार तुरूंगात जाऊन अरविंद केजरीवाल यांच्या आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या करण्याचे निर्देश दिले आहेत.
2 जूनला आत्मसमर्पण केले होते
अरविंद केजरीवाल यांना ईडीने दिल्लीतील दारू घोटाळ्याच्या आरोपाखाली 21 मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर त्यांना सुप्रीम कोर्टाने लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी 10 मे रोजी जामीन दिला होता. त्यावेळी जामीन देताना कोर्टाने केजरीवाल यांना 2 जुनला आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार अंतरिम जामीनाची मुदत समाप्त झाल्यानंतर केजरीवाल यांनी कोर्टाच्या आदेशानुसार 2 जून रोजी तिहार तुरूंगात आत्मसमर्पण केले. तर अरविंद केजरीवाल यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळल्यामुळे त्यांना आता 19 जूनपर्यंत तुरूंगात राहावे लागणार आहे.