गडचिरोली परिसरात स्फोटकांनी भरलेले कुकर्स आणि क्लेमोर पाईप्स सापडले

गडचिरोली, 06 मे: (विश्वजीत खाटमोडे) गडचिरोलीतील टिपागड परिसरात पोलीस आणि सुरक्षा यंत्रणेच्या पथकाने नक्षलवाद्यांनी हल्ला करण्याच्या हेतूने लपवून ठेवलेली स्फोटके, क्लेमोर माईन्स आणि प्रेशर कुकर्स यांचा शोध घेतला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान नक्षलवाद्यांचा हल्ला करण्याचा डाव गडचिरोली पोलिसांनी हाणून पाडला. लोकसभा निवडणुकीच्या काळात नक्षलवाद्यांनी हल्ला करण्याची योजना आखली होती. त्यानुसार, टिपागड परिसरात त्यांनी काही स्फोटके लपवून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

शोध मोहीमेत स्फोटके सापडली

या पार्श्वभूमीवर, गडचिरोलीतील टिपागड परिसरात या स्फोटकांचा शोध घेण्यासाठी सी-60 ची एक तुकडी आणि सीआरपीएफची एक क्यूएटी यांच्यासह 2 बीडीडीएस पथके तैनात करण्यात आली होती. या शोध मोहीमेत त्यांना आज त्याठिकाणी स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर, स्फोटकांनी भरलेले 3 क्लेमोर पाईप्स आणि श्रापनेल्स देखील सापडले. तर उर्वरित 3 क्लेमोअर पाईप्स कोणतेही स्फोटक नसलेले होते. सोबतच या पथकांना त्याच ठिकाणी एका प्लास्टिकच्या पिशवीत गनपावडर, औषधे आणि ब्लँकेट सापडले. यावेळी बीडीडीएसच्या पथकाने एकूण 9 आयईडी आणि 3 क्लेमोर पाईप्स घटनास्थळी नष्ट केले. उर्वरित साहित्य जागीच जळून खाक झाले आहे. या प्रकरणाचा सध्या गडचिरोली पोलीस तपास करीत आहेत. याप्रकरणी, गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हल्ल्याचा कट उधळला

दरम्यान, सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेल्या स्फोटकांचा शोध आता लागला आहे. निवडणुकीच्या काळात घातपात घडवून आणण्याचा त्यांचा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तर पोलीस आणि अन्य सुरक्षा दलाच्या या कार्याचे सध्या कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *