तिरुपती बालाजी लाडूचा वाद; जगनमोहन रेड्डी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

आंध्र प्रदेश, 22 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी असलेले तूप आणि माशाचे तेल मिसळण्याचा गंभीर आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने माजी मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारवर केला होता. त्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. त्यावरून देशाचे राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर, वायएस जगनमोहन रेड्डी यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याकडून तिरुमला तिरुपती देवस्थानची पावित्र्य, अखंडता आणि प्रतिष्ठा यांना कलंकित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे जगनमोहन रेड्डी यांनी या पत्रात म्हटले आहे.

https://x.com/ANI/status/1837776032167788640?s=19

रेड्डी यांनी पत्रात काय म्हटले?

आंध्र प्रदेश राज्यात घडत असलेल्या संतापजनक घटनांकडे तुमचे लक्ष वेधण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याकडून तिरुमला तिरुपती देवस्थानचे पावित्र्य, अखंडता आणि प्रतिष्ठा यांना कलंकित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भगवान व्यंकटेश्वराचे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात कोट्यवधी हिंदू भक्त आहेत आणि जर ही नाजूक परिस्थिती काळजीपूर्वक हाताळली नाही, तर या खोट्या गोष्टींमुळे विविध आघाड्यांवर दूरगामी परिणाम होऊ शकतात, असे जगनमोहन रेड्डी यांनी या पत्रात म्हटले आहे.



आपल्या अपयशापासून लोकांचे लक्ष विचलित करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी टीटीडीच्या कारभाराविरोधात खोटे पसरवले आहे. तिरुमला मंदिरात प्रसाद तयार करताना वापरण्यात येणारे तूप भेसळयुक्त असून, त्या तुपात प्राण्यांची चरबी असल्याचा खोटा आरोप त्यांनी केला. तिरुमला मंदिरात तयार करण्यात येणाऱ्या लाडूच्या या प्रसादाचे करोडो हिंदू भाविकांच्या हृदयात विशेष स्थान असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. या टिप्पणीमुळे करोडो हिंदू भाविकांना त्रास होऊ शकतो. जे तिरुमला लाडूला सर्वात पवित्र प्रसाद मानतात. चंद्राबाबू नायडू यांचे बिनबुडाचे दावे त्यांच्या सरकारच्या अपयशावरून लक्ष हटवण्याचा आणि त्यांचा राजकीय अजेंडा पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे याप्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी हस्तक्षेप करावा. तसेच या निराधार आरोपांवर त्वरित कारवाई मागणी वायएस जगनमोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पूर्वीच्या सरकारवर तिरुपती मंदिरातील प्रसादात वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी आणि माशाचे तेल मिसळण्याचा आरोप केला होता. यासंदर्भात प्रयोगशाळेचा अहवाल देखील प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यावरून मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सध्या केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *