बुलढाणा, 26 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “सदावर्ते यांना गाडी फोडण्याची शिक्षा कमी असून, त्यांनाच संपवायला पाहिजे होते.” असे वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले आहे. त्यांनी हे वक्तव्य पत्रकारांच्या समोर केले आहे.
अग्निवीर अक्षयच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत
“वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यामुळेच राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे त्यांना गाडी फोडण्याची शिक्षा कमीच आहे, त्यांना संपवायला पहिजे होतं. गुणरत्न सदावर्ते संपले असते, तर मराठ्यांच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असता. गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयीन लढाईत मराठा आरक्षणाच्या विरोधात प्रखरपणे बाजु मांडली होती. त्यावेळी ते जणूकाय सुडाने पेटले होते. या गाडी फोडणाऱ्यांनी सदावर्ते यांची चांगली व्यवस्था करायला पाहिजे होती.” असे संजय गायकवाड म्हणाले आहेत. त्यांच्या या अशा विधानामुळे आता हा वाद आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे.
सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड, मराठा क्रांतीचे तिघेजण ताब्यात
तत्पूर्वी, ही तोडफोडीची घटना झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सोबतच त्यांनी जरांगे पाटलांच्या अटकेची मागणी केली आहे. ही तोडफोड करणारे व्यक्ती हे मराठा क्रांती मोर्चाचे आहे. तसेच मला आणि माझ्या कुटुंबाला यापूर्वीही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. असे सदावर्ते यावेळी म्हणाले होते. तर दुसरीकडे मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी गुणरत्न सदावर्ते यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. “अशा प्रकारच्या हल्ल्याचे मी कधीही समर्थन करत नाही. हा हल्ला कुणी केला? हे आपल्याला माहित नाही. मराठा समाजाचे आंदोलक अशाप्रकारचे कृत्य कधीच करणार नाहीत.” असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
One Comment on “सदावर्तेंविषयी शिंदे गटाच्या आमदारांचे वादग्रस्त विधान”