मुंबई, 08 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) देशात लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, भाजपकडून मोदी की गॅरंटी अशा जाहिराती काढून प्रचार केला जात आहे. त्यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे. मोदी की गॅरंटी ही वैयक्तिक जाहिरात आहे. मोदी हे भाजपचे उमेदवार आहे. केंद्र सरकार खर्च करूनही वैयक्तिक जाहिरात करणं चूकीचं आहे. मोदी की गॅरंटीचा खर्च भाजपकडून किंवा मोदींकडून घ्या, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. भाजपच्या या जाहिराती संदर्भात निवडणूक आयोगात तक्रार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. त्यामुळे मोदी की गॅरंटी या जाहिरातीमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
भाजपच्या निवडणूक जाहिराती संदर्भात निवडणूक आयोगात तक्रार करणार आहे. मोदींची गॅरंटी ही वैयक्तिक जाहिरात आहे. मोदी हे भाजपचे उमेदवार आहे. खर्च केंद्र सरकार करूनही वैयक्तिक जाहिरात करणं चूकीचं आहे. मोदी की गॅरंटीचा खर्च भाजपकडून किंवा मोदींकडून घ्यावा – पृथ्वीराज चव्हाण pic.twitter.com/w23DZBhmX6
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) March 8, 2024


जाहिरातींचा खर्च मोदी किंवा भाजपकडून वसूल करण्यात यावा: चव्हाण
पंतप्रधानांची गॅरंटी किंवा केंद्र सरकारची गॅरंटी या शब्दांवर आमचा आक्षेप नाही. मात्र, एका व्यक्तीची गॅरंटी, भाजपची गॅरंटी किंवा मोदीची गॅरंटी हे योग्य नाही. हे आचारसंहितेचा भंग करणारे आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. मोदी हे भाजपचे उमेदवार आहेत. जनतेच्या पैशातून भाजप उमेदवाराचा प्रचार करणे नियमांच्या विरोधात आहे. मोदी की गॅरंटी या जाहिरातीचा आतापर्यंतचा संपूर्ण खर्च नरेंद्र मोदी किंवा भाजपकडून वसूल केला जावा, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.



या जाहिराती जनतेच्या पैशातून करता कामा नये: पृथ्वीराज चव्हाण
जनतेच्या पैशातून एका व्यक्तीचा प्रचार करणे हे चुकीचे आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेल कंपन्यांना मोदी की गॅरंटी ही जाहिरात करण्याचे आदेश देण्यात आल्याचे देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितले. याशिवाय सर्व विभागांना देखील मोदी की गॅरंटी हा प्रचार करण्याचे आदेश दिले आहेत. असा प्रचार करण्यास आमची काही हरकत नाही. मात्र, हा प्रचार सरकारी पैशातून आणि जनतेच्या कष्टाच्या पैशातून करता कामा नये, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी म्हटले आहे.

