मुंबई, 01 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) येत्या 3 मार्चपासून राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेस पक्षाने विधिमंडळ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये विधानसभेच्या मुख्य प्रतोदपदी अमित देशमुख तर विधानपरिषदेच्या गटनेतेपदी सतेज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्र काँग्रेस विधिमंडळ पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. यासंदर्भातील प्रसिद्धी पत्रक काँग्रेस पक्षाने जारी केले आहे.
https://x.com/INCMaharashtra/status/1895700851291037801?t=neppz4y2CTh3m1vqxMR7Eg&s=19
पाहा नवनियुक्त्या
काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेच्या गटनेतेपदी सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची, तर विधानसभेत उपनेतेपदी अमीन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषदेत मुख्य प्रतोदपदी अभिजीत वंजारी, तर विधानसभेत मुख्य प्रतोदपदी अमित देशमुख यांची नियुक्ती झाली आहे. तसेच, विधान परिषदेसाठी प्रतोदपदी राजेश राठोड, तर विधानसभेसाठी शिरीषकुमार नाईक आणि संजय मेश्राम यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेच्या सचिवपदी विश्वजीत कदम यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
3 मार्चपासून अधिवेशन
दरम्यान, महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्च 2025 या कालावधीत मुंबईत होणार असून 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अधिवेशनादरम्यान 8 मार्च रोजी शनिवार असल्याने सार्वजनिक सुटी असूनही विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, तर 13 मार्च रोजी होळीच्या निमित्ताने कामकाजास सुटी देण्यात येईल, असे राज्य सरकारने जाहीर केले आहे.
अर्थसंकल्पाकडे लक्ष!
या सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार आगामी आर्थिक वर्षासाठी कोणत्या योजना आणि प्रकल्प जाहीर करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, विरोधी पक्ष अधिवेशनात कोणते मुद्दे उचलून धरतो? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.