दिल्ली, 08 जून: (विश्वजीत खाटमोडे) वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET 2024 च्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली आहे. यंदा नीट परीक्षेतील 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले असून, याचा तपास करावा, असे या नेत्यांनी म्हटले आहे. तसेच भाजपने देशातील तरुणांची फसवणूक केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
https://twitter.com/kharge/status/1798958861090766972?s=19
भाजपने तरुणांची फसवणूक केलीय, मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
“पेपर फुटणे, गैरप्रकार आणि भ्रष्टाचार हे NEET सह अनेक परीक्षांचा अविभाज्य भाग बनले आहेत. याची सगळी जबाबदारी मोदी सरकारची आहे. उमेदवारांसाठी भरती परीक्षेत सहभागी होणे, नंतर अनेक गैरप्रकारांना सामोरे जावे लागणे, पेपरफुटीच्या चक्रव्यूहात अडकणे, त्यांच्या भवितव्याशी खेळ होत आहे. भाजपने देशातील तरुणांची फसवणूक केली आहे. आमची मागणी आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी व्हावी जेणेकरून NEET आणि इतर परीक्षांमध्ये बसलेल्या आमच्या हुशार विद्यार्थ्यांना न्याय मिळेल,” असे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/priyankagandhi/status/1798931926398783857?s=19
सरकार विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष का करतंय? प्रियंका गांधी यांचा सवाल
तर या संदर्भात प्रियंका गांधी म्हणाल्या की, “आधी NEET परीक्षेचा पेपर फुटला आणि आता निकालातही घोटाळा झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. NEET परीक्षेतील एकाच केंद्रातील सहा विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाल्याने अनेक गैरप्रकार उघडकीस आल्याने गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. दुसरीकडे निकाल समोर आल्यानंतर देशभरात अनेक मुलांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या येत आहेत. हे अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या आवाजाकडे सरकार दुर्लक्ष का करत आहे? विद्यार्थ्यांना NEET परीक्षेच्या निकालातील हेराफेरीशी संबंधित कायदेशीर प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. या न्याय्य तक्रारींची चौकशी करून त्या सोडवण्याची जबाबदारी सरकारची नाही का?” असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला आहे.
https://twitter.com/VijayWadettiwar/status/1799318439447642399?s=19
विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटले?
तसेच याबाबत काँग्रेस नेते तथा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी NEET परीक्षेत झालेल्या गैरप्रकारचा पाठपुरावा करून ही परीक्षा रद्द करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. नीट परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाला आहे. नीट परीक्षा देण्यासाठी जे विद्यार्थी दोन – तीन वर्षे तयारी करीत असतात त्यांचे आयुष्य या घोटाळ्यामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. घोटाळ्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना नुकसान होईल त्यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. नीट झालेल्या गैरप्रकाराची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी अशी मागणी मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी यांनी केली आहे. राज्य सरकारने सुद्धा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून ही परीक्षा रद्द करण्याचा मागणी करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही आमची मागणी आहे,” असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.