निलंबनाच्या कारवाईविरोधात आरोग्य अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

पुणे, 26 मे: (विश्वजीत खाटमोडे) पुणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईच्या विरोधात भगवान पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भगवान पवार यांचे हे पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. या पत्रावरून सध्या राज्याचे राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे.

https://twitter.com/RRPSpeaks/status/1794605257475215677?s=19

पत्रात काय म्हटले?

“मी सार्वजनिक आरोग्य विभागातील जेष्ठतम अधिकारी असून माझी एकूण सेवा 30 वर्ष झालेली असून जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे व सातारा येथे एकूण 13 वर्षे उत्कृष्ठ कामकाज केलेले आहे. कोरोनाच्या काळात मी पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून उत्कृष्ठ सेवा बजावलेली आहे. या ठिकाणी माझ्या कामकाजाबाबत कोणत्याही गंभीर तक्रारी नाहीत किंवा माझी प्रशासकीय चौकशी झालेली नाही, तरी देखील माझ्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. माझे कामकाज व सर्व्हिस रेकॉर्ड उत्तम असताना केवळ मागासवर्गीय अधिकारी म्हणून व हेतुपुरस्सरपणे त्रास देण्याच्या हेतूने प्रेरीत होवून माझे निलंबन करण्यात आलेले आहे,” असा आरोप डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

निलंबनाची कारवाई अन्यायकारक

“मंत्री महोदयांनी मला पुणे शहरातील कात्रज येथील कार्यालयात वारंवार बोलावून नियमबाह्य टेंडरची कामे, खरेदी प्रक्रियेची कामे व इतर कामामध्ये मदत करण्यासाठी दबाव आणला होता. परंतू मी नियम बाह्य कामात मदत केली नाही व इतर नियमबाह्य कामे केली नाहीत म्हणून माझे निलंबन करण्यात आलेले आहे. सबब माझे निलबंन हे माझ्या विरुद्ध तक्रारीमध्ये तथ्य नसतांनाही हेतुपुरस्सरपणे त्रास देण्याच्या हेतूने व माझे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी मंत्री महोदयांच्या दबावामुळे केलेले आहे अशी माझी धारणा आहे. झालेल्या निलंबनामुळे माझे मनोधैर्य खचुन गेले असून माझे कुटूंब मानसिक तणावा मध्ये आहे. निलंबन करीत असताना, माझ्या सध्याच्या कार्यकालातील तक्रारी नसताना केवळ जुन्या तक्रारी शोधून काढून आणि माझे म्हणणे सादर करण्याची कोणतीही संधी न देता माझे निलबंन करून माझ्यावर अन्याय झालेला आहे. तरी कृपया माझे केले निलबंन मागे घ्यावे ही नम्र विनंती आहे.” असे भगवान पवार यांनी या पत्रात म्हटले आहे.

रोहित पवारांचा सवाल

दरम्यान, त्यांच्या या पत्रावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “आरोग्य विभागात ॲम्बुलन्स खरेदीत साडेसहा हजार कोटी रुपयांची दलाली खाणाऱ्या भ्रष्टाचाराच्या ‘खेकड्या’ने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारण्यास सुरूवात केलीय. नियमबाह्य टेंडरिंगला नकार दिल्यामुळे व्यवस्थेतील याच खेकड्याने निलंबित केल्याची तक्रार पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडं केलीय. नियमबाह्य टेंडरसाठी कात्रजच्या कार्यालयात बोलावून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्यमंत्रीच आहे का? आणि असेल तर संपूर्ण आरोग्य खात्याला आपल्या पोखरणाऱ्या या मंत्र्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपण अजून किती दिवस पाठीशी घालणार? आरोग्य व्यवस्थेला लागलेली ही कीड काढण्यासाठी सर्जरी कधी करणार? असे सवाल रोहित पवार यांनी या ट्विटमधून केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *