बारामतीत बोगस वसुली एजेंट विरोधात तक्रार दाखल

बारामती, 9 जुलैः बारामती तालुक्यासह शहरात बोगस वसुली एजेंट गुंडांचा सुळसुळाट सुटला आहे. बँक तसेच वित्तीय संस्थांच्या खासगी वसुली एजेंट गुंडांमार्फत सर्वसामान्यांकडून दमदाटी करून किंवा तुमचे बँकेचे / वित्तीय संस्थांचे चारचाकी / दुचाकी वाहनाचे हप्ते थकले असल्याच्या बतावणी करत सामान्य कर्जदारांना घाबरवून त्यांच्याकडून वाहने घेऊन जाण्याचे किंवा कर्जदारांकडून तोडपाणीच्या नावाखाली हजारो रुपयांची खंडणी काढण्याचे प्रकार सर्रासपणे घडताना दिसत आहे.

ऐन पावसाळ्यात बारामतीवर पाणी संकट!

बारामती तालुक्यासह शहरातील सर्वसामान्य कर्जदारांची बोगस वसुली एजेंट गुंडांकडून होणारी मानसिक छळ आणि आर्थिक फसवणूक थांबविण्याच्या हेतूने सामाजिक कार्यकर्ते दयावान दामोदरे यांच्याकडून बारामती उपविभागीय पोलीस कार्यालयाला नुकताच तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

बारामती उपविभागीय पोलीस कार्यालयात केलेल्या तक्रारी अर्जात दयावान दामोदरेंनी म्हटले की, खासगी वसुली एजेंट गुंडांकडे कोणतेही अधिकृत प्रकारचे डीआरए (DRA)सर्टिफिकेट नसते, ज्या कंपनीचे वाहन आहेत, त्या कंपनीचे कोणतेही अधिकृत आय कार्ड नसते, वाहनांची रोडवर अडवणूक करून दमदाटी करत वाहन सोडण्याच्या मोबदल्यात खंडणी वसूल करतात. तसेच ही वसुली एजेंट गुंडांची टोळी बारामती शहरातील मार्केट यार्ड समोरील बाजूस, खंडोबानगर चौकात, कसबा येथील निलम पॅलेस चौक, एमआयडीसीमधील पैन्सिल चौक या ठिकाणी टोळीने थांबलेले दिसतात, सर्व वसुली एजेंट गुंडांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीशी निगडीत असल्याचा दावाही दयावान दामोदरे यांनी त्यांच्या तक्रारी अर्जात नमूद केले आहे. तसेच संबंधित खासगी वसूली एजेंट गुंडांवर कायदेशीर कारवाई करून सदर प्रकार थांबविण्याची विनंती ही अर्जात केली.

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या असंविधानिक?

तसेच कर्जदारांसोबत मानसिक छळ आणि आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडले असतील तर त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बोगस वसुली गुंडांविरोधात तक्रार नोंदवण्याचे आवाहनही दयावान दामोदरे यांनी केले आहे. दरम्यान, सासवड या ठिकाणीही असेच प्रकार घडत होते. कर्जदारांच्या गाड्या अडवून पैसे उकळणाऱ्या बोगस फायनान्स एजेंट रॅकेट पर्दाफाश पोलिसांनी करत दोघांवर गुन्हा दाखल झाले होते.

2 Comments on “बारामतीत बोगस वसुली एजेंट विरोधात तक्रार दाखल”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *