संभाजीनगर, 31 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज एमआयडीसी परिसरातील एका हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीत आज मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत सहा कामगारांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मध्यरात्री लागलेल्या या आगीत 6 कामगारांचा जळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून या मृत कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. याशिवाय जखमी कामगारांना तातडीने शासकीय खर्चाने सर्व वैद्यकीय उपचार द्यावेत अशाही सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1741373544951619594?s=19
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज एमआयडीसी परिसरात असलेल्या हातमोजे तयार करणाऱ्या कंपनीत भीषण आग लागली होती. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. यावेळी त्यांनी लगेचच याठिकाणी अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पहाटे साडेतीन वाजता या आगीवर नियंत्रण मिळवून ही आग विझविली.
तत्पूर्वी, अग्निशमन दलाच्या जवानांनी या कंपनीतील आगीमध्ये अडकलेल्या काही कामगारांना बाहेर काढले. मात्र, या दुर्घटनेत 6 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यानंतर अग्निशमन दलाने त्यांचे मृतदेह बाहेर काढले. दरम्यान, या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत. तर या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.